। तळा । वार्ताहर ।
तळा शहरातील सोनारआळी येथील रस्त्यावर पुन्हा खड्डा पडला असून, ‘येरे माझ्या मागल्या’अशी परिस्थिती झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. याकडे नगरपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. शहरातील सोनार आळीतील येथील मोरीवर मोठा खड्डा पडला होता. हा खड्डा दगड टाकून भरण्यात आला होता. याच रस्त्यावरून पुढे महाविद्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच वाड्या वस्त्या असल्याने दिवसभर नागरिकांची रहदारी सुरू असते. भारत गॅस ऑफिसला सिलिंडरच्या गाड्या नियमितपणे येत-जात असतात. या खड्ड्यामुळे दिवसा तसेच रात्रीच्या वेळी अपघात घडण्याचीदेखील शक्यता होती. याबाबत वृत्तपत्र व प्रसार माध्यमांमधून ही बातमी झळकताच हा खड्डा त्वरित बुजविण्यात आला.त्यामुळे नागरिकांमधून समाधानदेखील व्यक्त करण्यात आले होते. मात्र, हा खड्डा बुजविण्याचे काम इतके निकृष्ट दर्जाचे होते, की अवघ्या महिना भराच्या आतच या खड्ड्याची दुरवस्था झाली आहे. ठेकेदार आपल्या आर्थिक स्वार्थासाठी कसे निकृष्ट दर्जाची कामे करतात हे यातून स्पष्ट होते. या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.







