कोलाड हायस्कूलकडे जाणाऱ्या रस्त्याचे तीनतेरा

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघाताचा धोका

| कोलाड | प्रतिनिधी

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरुन कोलाड हायस्कूल कोलाडकडे जाणाऱ्या रस्त्याचे तीनतेरा वाजले असून, रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, अशी या रस्त्याची अवस्था झाली आहे. यामुळे या मार्गाने प्रवास करणारे विद्यार्थ्यांसह रहिवासी नागरिक तसेच प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

या मार्गावर प्राथमिक मराठी केंद्र शाळा, द.ग. तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रहिवासी वस्ती तसेच मधून जवळचा मार्ग असल्यामुळे धाटाव एमआयडीसीमध्ये कामावर जाणारे असंख्य गावातील कामगार याच मार्गाने ये-जा करीत असतात. गेली दोन ते तीन वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. तसेच हा रस्ता अरुंद असल्यामुळे मार्ग काढताना प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळे या मार्गावर अपघात होताना दिसत आहेत. काही दिवसापूर्वी या मार्गानी दुचाकीवरून प्रवास करणारा धाटाव एमआयडीसीकडे जाणारा कामगार खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे दुचाकी स्लिप होऊन खाली पडला, परंतु सुदैवाने तो थोडक्यात बचावला. रस्त्याच्या दुरवस्थेबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत असून, संबंधित विभागाने तात्काळ लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.

Exit mobile version