अपघाताला निमंत्रण; स्थानिकांमध्ये नाराजी
| पाताळगंगा | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था केव्हा संपणार? असा प्रश्न वावोशी फाटा ते वावोशी गाव या मार्गावरून प्रवास करणारे ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. या रस्त्यांची अक्षरश: चाळण झाल्याने हा मार्ग अपघाताला निमंत्रण देत आहे. वाहनचालक, प्रवासी, पादचारी, शाळकरी विद्यार्थी, महिला वर्ग या रस्त्याच्या दुरवस्थामुळे नाराजी व्यक्त करत आहेत. संबंधित प्रशासन या रस्त्यावरील खड्ड्यांचे जाणून गांभीर्य घेत, हा रस्ता खड्डेमुक्त करावा, अशी मागणी सध्या जोर धरत आहे. गेल्या काही वर्षांपासून हा रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात सापडल्याचे दिसून येत आहे.
वाहन चालकांना रस्त्यात खड्डा की, खड्ड्यात रस्ता कळत नसल्यामुळे दिवसागणिक अपघाताचे प्रमाणही वाढू लागल्याने याचा फटका सर्वाना आर्थिक व शारीरिक दुखापतीच्या स्वरूपात सोसावा लागत असल्याने प्रवासी आणि वाहन चालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. परंतु, गेल्या काही वर्षापासून वावोशी फाटा ते वावोशी गाव रस्त्याची खड्ड्यामुळे चाळण झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणे कष्टमय बनल्याने सर्वामध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. या मार्गावरील खड्ड्यातून पुढील मार्ग शोधणे जिकरीचे बनू लागल्याने संबंधित प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होऊ लागला आहे.
या मार्गावरून दररोज शेकडो शाळकरी विद्यार्थी, महिला वर्ग, प्रवास वर्ग ये-जा करत असतात. पायी चालताना अनेकांचे पाय खड्ड्यात पडल्याने मुरगळणे तसेच खड्ड्यातील मोठमोठाल्या दगडांमुळे गाडी स्लिप होणे, असे अपघात घडत असतात. त्यामुळे अनेकजण या रस्त्याबाबत संताप व्यक्त करीत आहेत. त्यामुळे संबंधित प्रशासनाने याचे गांभीर्य घेत हा रस्ता लवकरात लवकर खड्डेमुक्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे. तरी, संबंधित प्रशासन याचे गांभीर्य घेणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
वावोशी फाटा ते वावोशी गाव रस्ता गेल्या काही वर्षापासून खड्ड्यांच्या विळख्यात सापडल्याने येथून प्रवास करणे सर्वांना कठीण बनले आहे. संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने याचे गांभीर्य न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.
– महेश कडू, माजी उपसरपंच, वावोशी







