वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, नागरिकांमधून संताप
| चौल | प्रतिनिधी |
मुरुड तहसील कार्यालयाच्या आवारात असणाऱ्या स्वच्छतागृहांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. तहसीलदारांसह दुय्यम निबंधक याच आवारात बसत असतानाही या मूलभूत सुविधेकडे होणारे दुर्लक्ष नागरिकांच्या संतापाचे कारण ठरत आहे.
मुरुड तहसील कार्यालयात दररोज तालुक्यातील कानाकोपऱ्यातून हजारो नागरिक आणि महिला विविध शासकीय कामांसाठी येत असतात. मात्र, येथील स्वच्छतागृहात प्रचंड अस्वच्छता पसरली असून, त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. झाडा-वेलींच्या जंगलाने स्वच्छतागृहांना विळखा घातला आहे. विशेष म्हणजे, याच आवारात तहसीलदार आदेश डफळ आणि दुय्यम निबंधक यांचे कार्यालय आहे. सध्या जमीन विक्रीची कामे तसेच तहसीलदार कार्यालयात येणाऱ्या महिलांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. असे असतानाही तहसीलदार आदेश डफळ यांचे या गंभीर समस्येकडे लक्ष नसल्याचे चित्र दिसत आहे. संतापाची गोष्ट म्हणजे, महिलांच्या स्वच्छतागृहाला तर टाळे लावण्यात आले आहे. यामुळे महिलांची कुंचबणा होत आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या स्वच्छतागृहाची ही अवस्था प्रशासनाची एकूणच उदासीनता उघड करत आहे. या अस्वच्छतेमुळे रोगराई पसरण्याची भीती असून, महिलांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. तहसीलदारांनी यात तातडीने लक्ष घालून स्वच्छतागृह दुरुस्त करावे आणि त्याची नियमित साफसफाईची सोय लावावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.
स्वच्छतागृहांची तात्काळ स्वच्छता करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात येतील. यापुढे स्वच्छतागृह नियमित स्वच्छ ठेवण्याची ताकीद देण्यात येईल.
आदेश डफळ,
तहसीलदार, मुरुड










