वडगाव-गुतीची वाडी रस्त्याची दुरवस्था

काम तातडीने सुरु करण्याची मागणी

| पेण | प्रतिनिधी |

पेण तालुक्यातील जिर्णे ग्रामपंचायत हद्दीतील महसुली गाव जिर्णे व या गावाच्या अंतर्गत येणाऱ्या आदिवासी वाड्यांना जोडणारा वडगाव जिर्णे जिल्हा मार्ग 42 हा रस्ता सुमारे 50 ते 60 वर्ष प्रचलीत आहे. हा रस्ता पूर्णताः मातीचा असल्याने पावसाळ्यात पुर्णपणे वाहून जातो. मात्र, पावसाळा संपल्यानंतर आदिवासी तरुण एकत्र येउन श्रमदानातून या रस्त्याची दुरुस्ती करतात. त्यानंतर तो रस्ता पुढील आठ ते नऊ महिने दळणवळणासाठी उपयोगी पडतो. परंतु, पावसाळ्यात या रस्त्यावरुन ये-जा करणे कठीण होते. त्यामुळे जिर्णे विभागातील आदिवासी बांधवांना पेण शहराकडे येण्यासाठी 24 किलोमीटरचा वळसा मारावा लागतो. हा रस्ता कायमस्वरुपी शासनाने केल्यास वडगाव ते जिर्णे अंतर फक्त साडेतीन किलामीटरचे असेल. त्यामुळे वेळ पैसा वाचून जिर्णे विभागातील आदिवासी बांधव पेण शहराच्या जवळ येतील. महत्वाची बाब म्हणजे वडगाव ते जिर्णे जिल्हा ग्रामीण रस्ता जुलै 2024 मध्ये पुरवणी अर्थ संकल्पामध्ये मंजूर करण्यात आला आहे. तो रस्ता वडगाव ते गुतीची वाडी तातडीने पूर्ण करावा, अशी मागणी प्रसार माध्यमांसमोर जिर्णे विभागातील आदिवासी बांधवांनी केली आहे.

Exit mobile version