। उरण । वार्ताहर ।
उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाला अनेक समस्यांनी ग्रासले आहे. त्यातच रुग्णालयाच्या नूतनीकरण करण्यात आलेली बांधकाम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. त्यामुळे त्यासाठी खर्च करण्यात आलेला निधी वाया गेला आहे.
उरण शहर परिसरातील सुमारे 1 लाख जनतेच्या आरोग्याची काळजी घेणारे रुग्णालय म्हणून याकडे पाहिले जाते. तालुक्यातील सर्वसामान्य रुग्ण आजारांवर उपचार करुन घेण्यासाठी दररोज मोठ्या संख्येने रुग्णालयात येजा करतात. इमारत सुसज्ज असावी तसेच तेथे अत्याधुनिक सुविधा असाव्यात यासाठी शासनाकडून शासकीय निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.तालुक्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांकडूनही निधी देण्यात येतो.मात्र प्राप्त होणार्या निधीतून रुग्णालयात अत्यंत निकृष्ट दर्जाची कामे होत असल्याचे भयानक चित्र नागरीकांना पाहवयास मिळत आहे.
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारणार्या डॉ बी.एम.कालेल यांनी कामकाजाचा आढावा घेऊन रुग्णालयाच्या नुतनीकरण कामात झालेल्या कामाची चौकशी करावी अशी मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे.