निवडणूक कर्मचार्‍यांना निकृष्ट दर्जाचे भोजन

मतदान केंद्रांवरील कर्मचार्‍यांचा आरोप

। अलिबाग । प्रतिनिधी ।

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना देण्यात आलेले भोजन निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप काही कर्मचार्‍यांनी केल्याचे समोर आले आहे. त्यात ते भोजन पोटभरदेखील नसल्याची खंत काही कर्मचार्‍यांनी व्यक्त केली आहे. मात्र ते उघड बोलत नसल्याने त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर माहीती उघड केली.

रायगड लोकसभा मतदार संघातील दोन हजार 185 मतदान केंद्रामध्ये सुमारे तेरा हजार कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये महसूल, जिल्हा परिषद, पोलीस व आरोग्य, एसटी महामंडळ, आशा सेविका, शिक्षक, सार्वजनिक बांधकाम विभाग अशा वेगवेगळ्या विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला होता. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी या कर्मचार्‍यांनी जीवाची बाजी लावली. मतदान केंद्रात चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्नदेखील करण्यात आला. मात्र सेवा देणार्‍या कर्मचार्‍यांच्या पोटावर मारण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा जोरात रंगली आहे. कर्मचार्‍यांना पॅकींगमध्ये देण्यात येणारे भोजन व नास्ता निकृष्ट दर्जाचा असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु होती. पण तक्रार सांगणार कोणाला अशी परिस्थिती या कर्मचार्‍यांकडे झाली होती.

कर्मचार्‍यांना देण्यात येणार्‍या पॅकींगमधील भोजनामध्ये दोन पुरी, भात, भाजी असे होते. त्या पदार्थदेखील बेचव असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकारामुळे कर्मचारी वर्गात नाराजीचे सूर उमटले आहेत. हे पदार्थ बनविण्याचा ठेका कोणत्यातरी एका एजन्सीला देण्यात आला आहे. या एजन्सीमार्फत पॅकींग खुप चांगल्या पध्दतीने करण्यात आली आहे. मात्र भोजन बेचव असल्याची माहिती कर्मचार्‍यांनी नाव न सांगण्याच्या अटीवरून दिली आहे. तसेच केंद्रापर्यंत घेऊन जाणार्‍या 52 एसटी बसपैकी फक्त पाच ते सहा बसमध्ये पिण्याच्या पाण्याचे बॉक्स देण्यात आले. उर्वरित बसमध्ये पाण्याचे बॉक्स न दिल्याने पाण्याविनाच या बसेस केंद्रात गेल्याची माहिती देण्यात आली आहे.

Exit mobile version