| शिहू | प्रतिनिधी |
नागोठणे-पोयनाड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी वाहन चालकांसह प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या धुळीमुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच, पाऊस पडल्यावर या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरत आहे. त्यामुळे या चिखलातून मार्ग काढताना दुचाकी वाहने घसरून अपघात घडत आहेत, तर अनेकांना गंभीर दुखापत होत आहे. याला जबाबदार कोण, असा सवाल प्रवासी वर्गातून केला जात आहे.
त्यातच नागोठणे नजीक असलेल्या रिलायन्स कंपनीच्या मोठंमोठ्या प्रकल्पांचे काम युद्ध पातळीवर सुरु असून मातीचे ओव्हरलोड ट्रक, मोठी अवजड वाहने याच मार्गाने ये-जा करत आहेत. परिणामी ठिकठिकाणी खड्डे, रस्त्यावर सर्वत्र पसरलेली धुळ उठत आहे. या धुळीमुळे सर्दी, खोकला, दमा, घशाचे व डोळ्यांच्या आजारांनी डोके वर काढले आहे. तसेच, पाऊस पडल्यावर त्याचे रूपांतर चिखलात होते. यामुळे वाहने घसरून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. एखादा मोठा अपघात होऊन जर नाहक बळी गेला तर याला जबाबदार कोण? कंपनीला जनतेच्या जीवासी खेळण्याचा अधिकार कोणी दिला? कंपनीने हा जीवघेणा खेळ थांबवावा अन्यथा जनतेचा उद्रेक होईल, असा संतप्त सवाल त्रस्त जनता करत आहे.







