तळा बाजारपेठेत रस्त्याचे निकृष्ट बांधकाम

जनहित याचिका दाखल करण्याची मागणी

| तळा | वार्ताहर |

तळा बाजारपेठेत करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामाचा दर्जा हा निकृष्ठ झाला असल्याने या कामाबाबत जनहित याचिका दाखल करण्याची मागणी तळा शहरातील नागरिकांकडून करण्यात येत होती. यामध्ये जनतेच्या मागणीचा विचार करून भाजपचे तालुका अध्यक्ष ऍड. निलेश रातवडकर हे सदर रस्त्याच्या कामाबाबत जनहित याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शहराच्या विकासासाठी मंजूर करण्यात आलेल्या 2 कोटी 63 लाख रुपयांच्या विकासकामांसाठीच्या निधीतील जवळपास 54 लक्ष रुपयांचे हे काम असून तळा बसस्थानक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण असे या कामाचे स्वरूप होते. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर अवघ्या महिनाभरातच काही ठिकाणी खडी निघाल्याचे चित्र दिसत होते. तसेच या रस्त्याला आकार, उकार नसून मच्छीमार्केट येथील रस्त्याची लेव्हल ही वरखाली असल्याने या ठिकाणी नेहमीच पाणी तुंबून राहते व त्यामुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरलेले असते. तसेच हेच चिखलाचे पाणी वाहनांच्या येण्याजाण्याने नागरिकांच्या अंगावर देखील उडत असल्याने नागरिकांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. ऍड. निलेश रातवडकर यांनी तळा नगरपंचायत प्रशासनाकडे याबाबत लेखी तक्रार करूनही मुख्याधिकारी यांच्याकडून कोणतेच उत्तर देण्यात आलेले नसून नगरपंचायत प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे या कामाबाबत जनहित याचिका दाखल करणार असल्याचे भाजप तालुका अध्यक्ष अ‍ॅडय निलेश रातवडकर यांनी सांगितले.

Exit mobile version