। तळा । वार्ताहर।
तळा बाजारपेठेतील रस्ता दुरुस्तीच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. तळा बाजारपेठेत काही महिन्यांपूर्वी रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले होते. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने काही दिवसांमध्येच या रस्त्याची खडी उखडून त्याला खड्डे पडले. तसेच रस्त्याची लेव्हल चुकल्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावर पाणी तुंबून राहू लागले व याचा त्रास बाजारपेठेत येणारे नागरिक,वाहनचालक तसेच व्यापार्यांना सहन करावा लागत होता. याबाबत भाजप प्रदेश सचिव रवि मुंढे यांनी मुख्याधिकारी धिरज चव्हाण यांच्यासोबत तळा नगरपंचायत कार्यालयात बैठक घेऊन सदर रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली होती.
तसेच प्रसारमाध्यमांमधून देखील बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर मुख्याधिकारी धिरज चव्हाण यांनी यामध्ये लक्ष देऊन संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावून रस्त्याच्या दुरीस्तीचे आदेश दिले. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने शुक्रवार पासून तळा बाजारपेठेतील रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामास सुरुवात केली. यामुळे बाजारपेठेतील वाहने बंद करण्यात आल्यामुळे बाजारपेठ परिसरातशुकशुकाट पसरल्याचे चित्र पाहायला मिळाले.