श्रीवर्धनमध्ये रस्त्यांची निकृष्ट कामे

अंतर्गत मार्गावरील खडी उकरली; कोट्यवधी रुपये पाण्यात

| श्रीवर्धन । वार्ताहर ।

निसर्ग पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीवर्धन तालुक्यातील श्रीवर्धन-दांडगुरी मार्गावरील वावेपंचतन येथील डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप वाहनचालकांसह नागरिकांकडून करण्यात येत आहे. रस्ते गुळगुळीत दिसत असलेतरी अनेक ठिकाणी खडी उकरली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे झाल्याचे सांगण्यात येत आहे. बांधकाम विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, तीन किमीच्या रस्त्यासाठी चक्क तीन कोटी रुपये खर्च केले असूनही रस्ता निकृष्ट झाला असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

कोकणातील पर्यटन वाढावे, म्हणून महाराष्ट्र शासनाकडून विविध पातळीवर अनेक प्रयत्न केले जात आहेत. येथील समुद्रकिनार्‍याचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. येथील किनार्‍यांसह पर्यटनस्थळाची जाहिरात विविध समाजमाध्यमांतून करण्यात येत आहे. मात्र, येथील अंतर्गत रस्त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर येणार्‍या पर्यटकांना येथील खराब रस्त्यांचा सामना करावा लागत आहे. नुकतेच श्रीवर्धन तालुक्यातील श्रीवर्धन-दांडगुरी मार्गावरील वावेपंचतन येथील अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. या तीन किमीच्या रस्त्यासाठी तीन कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र, तरीदेखील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे वाहनचालकांकडून सांगण्यात येत आहे.

वळणावरील खडी उकरली
रस्त्याच्या दुरुस्तीदरम्यान डांबराचा वापर कमी करण्यात आला आहे. तसेच साईटपट्टी योग्यप्रकारे केली जात नसल्याचे सांगण्यात येत आहे. कामाचा दर्जा, साईडपट्टी, डांबर, खडी आदी सर्व बाबी लक्षात घेऊन दर्जात्मक काम करणे गरजेचे होते. मात्र, ठेकेदारांकडून रस्त्याच्या कामात थुकपट्टी लावण्यात आली आहे. सुरुवातीला डांबरमिश्रीत खडीचा थर टाकला आहे. मात्र, वळणावर त्यातील खडी पूर्णपणे विखुरली गेल्याचे दिसून येत.


विभागाकडून रस्त्याची पाहणी करू. काम निकृष्ट असेल तर ठेकेदाराच्या अनामत रकमेमधून पुन्हा काम करून घेऊ.

तुषार लुंगे, उपअभियंता, श्रीवर्धन सार्वजनिक बांधकाम विभाग
Exit mobile version