पोपटीसाठी पावट्याच्या शेंगांचा आधार

जिल्ह्यात सर्वत्र पोपटी पार्टीचे आयोजन
। तळा । वार्ताहर ।
सरत्या वर्षाशेवटी वातावरणात गारवा जाणवू लागल्याने सर्वत्र खवय्यांकडून पोपटीचा बेत आखला जात आहे. मात्र पोपटी करण्यासाठी वालाच्या शेंगा अजूनही बाजारपेठेत उपलब्ध न झाल्याने त्याला पर्याय म्हणून पावट्याच्या शेंगांना नागरिकांनी पसंती दर्शवली आहे.
यावर्षी अवकाळी पाऊस व बदलत्या हवामानाचा फटका वाल पिकाला बसला असून मोठ्या प्रमाणावर वालाच्या शेतीचे नुकसान झाले आहे. परिणामी बाजारपेठेत वालाच्या शेंगा उपलब्ध झालेल्या नाहीत. यामुळे तळा बाजारपेठेत पावट्याच्या शेंगांना मागणी वाढली आहे. दरवर्षी साधारणपणे वर्षाच्या शेवटी थंडी पडू लागली की कोकणात विशेषतः रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पोपटीच्या पार्ट्या आयोजित केल्या जातात.

थंडी पडू लागल्याने खवय्यांची मने आपसूकच पोपटी करण्याकडे वळू लागली आहेत. मात्र पोपटीसाठी लागणार्‍या वालाच्या शेंगा यावर्षी अवकाळी पावसामुळे वेळेत उपलब्ध होऊ न शकल्याने त्याला पर्याय म्हणून नागरिकांनी पावट्याच्या शेंगा वापरण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे बाजारपेठेत पावट्याच्या शेंगांना मागणी वाढली आहे.
मनोज तळकर, भाजी विक्रेते.

Exit mobile version