दोन हजार हेक्टर जमिनीचा आणि वनजमिनीचा प्रश्न गंभीर
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील पोश्री नदीवर मोठे धरण बांधण्याचे कोकण पाटबंधारे विभागाचे नियोजन आहे. या धरणामुळे तीन तालुक्यांतील साडेतीन हजार हेक्टर जमीन ओलिताखाली आणली जाणार आहे. तब्बल पाच किलोमीटर लांबीचा बांध घातला जाणार आहे. दरम्यान, या धरणाचे जी जमीन बाधित होणार आहे, त्यातील अर्ध्याहून अधिक जमीन स्थानिक शेतकर्यांची तर एक हजार हेक्टर जमीन वनविभागाची आहे आणि त्यामुळे धरण बांधण्यास शेतकर्यांचा विरोध आणि वनजमीन मिळविण्यासाठी कसरत करावी लागत असल्याने वनजमिनीमुळे धरण या भागात होण्याची शक्यता कमीच आहे. तसेच हे धरणदेखील लालफितीत अडकून पडण्याची शक्यता आहे.
बोरगाव आणि कुरुंग गावाच्या मागे असलेल्या दोन मोठ्या टेकडीमधील पाच किलोमीटर लांबीचा बांध बांधला जाणार आहे. या धरणामुळे बोरगाव, उंबरखांड आणि चई अशा तीन गावांचे स्थलांतर करावे लागणार आहे. धरणाचा मुख्य जलाशय तसेच मातीच्या बांधासाठी दोन हजारांहून अधिक हेक्टर जमीन लागणार आहे. त्या भागात वनजमीनदेखील मोठ्या प्रमाणात असून, साधारण हजार हेक्टर वनजमीन या धरणाच्या बाधित क्षेत्रात जाणार आहे. त्यामुळे धरणासाठी जमीन मिळेल असा विश्वास कोकण पाटबंधारे विभागाला आहे. मात्र वन विभागदेखील सहजासहजी जमीन देत नसल्याची कर्जत तालुक्यात अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे कर्जत तालुक्यात धरण बांधून ठाणे जिल्ह्यात पाणी नेण्याचे स्वप्न बघणार्या कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांना आहे. मात्र, कर्जत तालुक्यातील ज्या पोश्री नदीवर बांध घालून धरण बांधण्याची तयारी चालविली आहे. मात्र, वनजमीन मिळविण्यासाठी कर्जत तालुक्यातील अनेक प्रकल्प प्रलंबित आहेत. त्यामुळे बोरगाव येथे होणारे प्रस्तावित धरण हे वनजमिनीच्या अडचणीमुळे बासनात गुंडाळले जाण्याची शक्यता आहे.
कर्जत तालुक्यातून पुणे जिल्ह्यात जाणारा उरण-पनवेल-नेरळ-कशेळे मंचर या घाट मार्ग रस्त्याचे काम केवळ पाच किलोमीटर लांबीचा रस्ता वन विभाग यांच्याकडून दहा वर्षांपासून अडवून ठेवला आहे. भीमाशंकर अभयारण्य भागातून हा रस्ता जात असून, मुंबई-पुणे अंतर या महामार्गामुळे कमी होणार आहे. तेथे वनजमीन मिळविण्यात अडचणी रस्त्याचे काम पुढे जात नाही. त्याच भीमाशंकर अभयारण्य भागापासून जवळ असलेल्या बोरगाव, चई येथील तब्बल एक हजार हेक्टर जमीन धरणासाठी लागणार आहे. एवढी मोठी जमीन मिळविण्याचे दिव्य कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांच्यावर आहे. त्याचवेळी कर्जत तालुक्यातील कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यातील काही भाग हे वनजमीन मिळत नसल्याने अडवून ठेवले आहेत. वन विभागाची जेमतेम पाच एकर जमीनदेखील या रस्त्याच्या रखडलेल्या कामासाठी दहा वर्षे सार्वजनिक बांधकाम खात्याला जमीन देण्यास वन विभाग यांच्याकडून सतत आडकाठी आणली जात आहे. त्यामुळे वनजमिनीमुळे कर्जत तालुक्यातील बोरगाव येथे होणारे धरण लाल फितीत बंद राहण्याची शक्यता आहे.