गेल प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न जिल्हाधिकार्‍यांच्या दरबारी

। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील उसर येथील गेल कंपनीच्या प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्‍नांबाबत गेल्या अनेक वर्षापासून प्रकल्पग्रस्त लढा देत आहेत. या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी अनेकवेळा बैठका झाल्या. मात्र त्यावर काहीही तोडगा निघाला नाही. या प्रकल्पग्रस्तांनी अखेर रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या दरबारी धाव घेऊन प्रश्‍न मांडले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या समवेत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. मात्र या चर्चेनंतर जिल्हाधिकारी व गेल प्रशासन काय भुमिका घेणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

उसर येथील गेल इंडिया कंपनीचे प्रकल्पग्रस्त गेल्या वर्षापासून त्यांच्या प्रश्‍नांबाबत संघर्ष करीत आहेत. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी दुपारी राजस्व सभागृहात बैठक घेण्यात आली. या बैठकीत लोकप्रतिनिधी, अलिबागचे उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे, पुनर्वसन अधिकारी, एमआयडीसी, गेल कंपनीचे अधिकारी, शेतमजूर संघटनेचे निलेश गायकर, नरेश ठाकूर, दत्तात्रेय ठाकूर, सुरेश धसाडे, अनंत शिंदे, निखिल पाटील व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत प्रकल्पग्रस्तांना कायम नोकरीत सामावून घेणे, स्थानिकांना प्रथम प्राधान्य देणे, स्थानिकांकडे आलेल्या ट्रक, डंम्परला समान मटेरियल सप्लाय देणे, सध्या सुरू असलेल्या प्रत्येक कॉन्ट्रॅक्टमध्ये स्थानिकांची नेमणूक करणे, प्रकल्पबाधीत गावांना एमआयडीसीचे पाणी अल्प दरात उपलब्ध करून देणे, सर्व प्रकल्पबाधित गावांना गेल कंपनीच्या लाईनवरून विज जोडणी करून देणे अशा अनेक प्रकारची मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली. या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली.

Exit mobile version