वीज समस्यांवर सकारात्मक बैठक

| पनवेल | प्रतिनिधी |

करंजाडे परिसरातील वाढत्या वीज समस्यांबाबत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत नुकतीच सकारात्मक बैठक पार पडली. या बैठकीत परिसरातील नागरिकांनी वीजपुरवठ्याशी संबंधित विविध प्रश्न मांडले. महावितरणचे कार्यकारी अभियंता जितेंद्र जनार्दन माने यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला करंजाडे विभागाचे अभियंता पालवे, पनवेल महावितरणचे अधिकारी सातपुते, माजी सरपंच रामेश्वर बबन आंग्रे, पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक गणेश कडू तसेच विविध सेक्टरमधील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. बैठकीदरम्यान रामेश्वर आंग्रे यांनी करंजाडे नोडमधील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, अपुऱ्या क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर, जुन्या व धोकादायक केबल्स तसेच उघड्या फिडर पिलरमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. गरज असलेल्या भागांत नवीन ट्रान्सफॉर्मर आणि डीटीसी उभारण्याची मागणी करण्यात आली. यावेळी नागरिकांनी वीज यंत्रणेच्या दुरुस्तीबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली. तसेच परिसरातील जर्जर आणि उघड्या केबल्स बदलून सुरक्षित वीज व्यवस्था उभारण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सर्व समस्या गांभीर्याने ऐकून घेत लवकरात लवकर आवश्यक उपाययोजना राबविण्यात येतील, तसेच करंजाडे परिसरातील वीजपुरवठा अधिक सक्षम आणि सुरळीत करण्यासाठी सकारात्मक पावले उचलली जातील, असे आश्वासन दिले.

Exit mobile version