गतिरोधकांमुळे अपघाताची शक्यता

| मुरूड-जंजिरा | वार्ताहर |

मुरूडपासून दीड किलोमीटर अंतरावर असणार्‍या बोर्डाच्या प्रसिद्ध खोरा बंदर जेट्टीकडे जाणार्‍या मार्गाचे सिमेंटीकरण नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. या सुमारे अर्धा कि.मी. मार्गावर चार उंच स्पीड ब्रेकर टाकण्यात आले असून, अशा प्रकारच्या सदोष स्पीड ब्रेकरमुळे वाहनांना दणका मिळून अपघाताची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. वाहन चालकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून असे स्पीड ब्रेकर असल्याचे म्हटले आहे.

खोरा जेट्टीवरून जंजिरा किल्ल्यात जाण्याची लॉन्च सेवा असल्याने जाण्यासाठी पर्यटकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे वाहनेदेखील मोठ्या प्रमाणात येत असतात. केवळ अर्धा कि.मी.च्या अंतरातमध्ये चार गतिरोधक टाकण्यात आले असून, हा प्रकार अनाकलनीय आहे, अशी चर्चा देखील सुरू आहे. खोरा बंदर हा भाग एकदरा ग्रामपंचायतीच्या हद्दीत असला तरी बोर्डाकडे आहे.

दरम्यान, या गतिरोधकांना स्लोप देऊन उंची कमी करणे आवश्यक आहे, असे मत मुरूड पत्रकार संघाचे सचिव सुधीर नाझरे यांनी व्यक्त केले. तर असे गतिरोधक चुकीचे आणि वाहनचालकांना अतिधोकादायक असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते मोहन शंकर पाटील, रियाज लसने यांनी व्यक्त केले. याबाबत बोलताना एकदरा महादेव कोळी समाजाचे अध्यक्ष मुरूड तालुका मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष पांडुरंग आगरकर, रोहन निशानदार यांनी हे गतिरोधक पर्यटक आणि नागरिकांसाठी धोकादायक असल्याचे संबंधित ठेकेदाराला सांगून यावर त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे.

Exit mobile version