पुणे दहशतवाद्यांच्या रडारवर?

। पुणे । प्रतिनिधी ।

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या एका पत्राने पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे. पुण्यात दहशतवाद्याकडून बॉम्ब स्फोटाची शक्यता असल्याचं त्यांनी म्हटले आहे. या पत्रात त्यांनी म्हटलंय की, ’’एखादी अतिरेक संघटना गर्दीचे ठिकाण लक्ष करून बॉम्बस्फोटासारखी दुर्घटना घडवून आणून त्यातून मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.’’ पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हा इशारा दिला आहे. पोलीस आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावून पुणे शहरातील एका नामांकित हॉटेल व्यवस्थापनाला धोक्याचा इशारा दिला आहे.

कल्याणी नगर परिसरात असलेल्या या नामांकित हॉटेलला पोलिसांकडून अनेकदा आवाज मर्यादित ठेवण्याबाबत नोटीस बजावण्यात आल्या आहेत. हॉटेल उशिरापर्यंत चालू ठेवत असल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत. या हॉटेल व्यवस्थापनाकडून अनेकदा डिस्कोथेक परवान्यातील अटी शर्तीचा भंग करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी वेळोवेळी कारवाया केल्या असूनही संबंधित हॉटेल व्यवस्थापनाकडून याकडे हेतू पुरस्कर कानाडोळा केला जात असल्याचा आरोप या कारणे दाखवा नोटीस पत्रातून करण्यात आला आहे.

पोलीस अलर्ट
पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीच ही शक्यता व्यक्त केल्याने पुणे पोलीसदेखील अलर्ट झाले आहेत. या हॉटेलमध्ये मोठी गर्दी होत असल्याने सुरक्षेच्या बाबतीत मात्र तितकी गंभीरता दिसत नाही. त्यामुळे जर एखादी मोठी घटना घडली तर त्यामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे.
Exit mobile version