व्यापाऱ्यांच्या अतिक्रमणामुळे बाजारपेठेत पाणी तुंबण्याची शक्यता

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| आगरदांडा | प्रतिनिधी |

नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मुरुड जंजिरा नगरपरिषद प्रशासनाने आपली जबाबदारी पार पाडत पावसाळापूर्व तयारी वेळेत पूर्ण केली आहे. शहरातील सर्व प्रमुख नाले, गटारे व पर्जन्य जलवाहिन्यांची व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मात्र, व्यापाऱ्यांच्या अतिक्रमणांमुळे गटारांमधील पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडथळित होत असून मुसळधार पावसाच्या वेळी बाजारपेठ परिसरात पाणी तुंबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुरुड जंजिरा नगरपरिषदेच्या वतीने यंदाच्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व प्रमुख नाले, गटारे व पर्जन्य जलवाहिन्यांची व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे. नगरपरिषदेने शहरातील ओली व सुक्या गटारांची खोदाई करून त्यामधील गाळ, प्लास्टिक व इतर कचरा पूर्णतः काढून स्वच्छता केली असून पावसाळ्यात पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी आवश्यक उपाययोजना पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी जलद गतीने वाहून जाण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नगरपरिषद प्रशासनाने आपली जबाबदारी पार पाडत पावसाळापूर्व तयारी वेळेत पूर्ण केली आहे. मात्र, शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात काही व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांसमोर सिमेंटचे ढापे टाकून तसेच सार्वजनिक रस्त्यावर पायऱ्या व इतर बांधकामे करून अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले आहे. या अतिक्रमणांमुळे गटारांमधील पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडथळित होत असून मुसळधार पावसाच्या वेळी बाजारपेठ परिसरात पाणी तुंबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नगरपरिषदेच्या वतीने संबंधित व्यापाऱ्यांना अतिक्रमण हटविण्याबाबत वारंवार नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. तसेच सार्वजनिक जागेवरील अनधिकृत बांधकामे व गटारांवरील अडथळे हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तथापि, अनेक व्यापाऱ्यांनी या नोटिसांकडे दुर्लक्ष केल्यामुळे परिस्थिती गंभीर बनण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

स्वखर्चाने अतिक्रमणे हटवावीत
नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, शहरातील गटार सफाई व पावसाळापूर्व तयारीची सर्व कामे पूर्ण करण्यात आली असून बाजारपेठेत पाणी तुंबल्यास त्यास काही व्यापाऱ्यांनी केलेले अतिक्रमण व गटारांवरील अनधिकृत बांधकामे कारणीभूत ठरतील. सार्वजनिक हित लक्षात घेऊन व्यापाऱ्यांनी स्वखर्चाने अतिक्रमणे तात्काळ हटवावीत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
कायदेशीर कारवाई करणार
पावसाळ्याच्या काळात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी नगरपरिषद कटिबद्ध असून अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सूचित केले आहे. नगरपरिषदेच्या सकारात्मक प्रयत्नांना सहकार्य करून सार्वजनिक रस्ते व गटारे अतिक्रमणमुक्त ठेवणे ही प्रत्येक नागरिक व व्यापाऱ्याची सामूहिक जबाबदारी असल्याचेही प्रशासनाने नमूद केले आहे.
Exit mobile version