रेवदंडा आरोग्य केंद्रातील डॉक्टरांचा मनमानी कारभार
| अलिबाग | प्रमोद जाधव |
आरोग्य विभागाच्या अनागोंदी आणि भोंगळ कारभारामुळे शवविच्छेदनासाठी आणलेल्या मृतदेहाची हेळसांड झाल्याचे समोर आले आहे. अलिबाग तालुक्यातील महाजने येथील आत्महत्या केलेल्या वृद्धाचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेला असता येथील डॉक्टरांनी अपुऱ्या व्यवस्थेचे कारण सांगून अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात पाठविले. अपुरी सुविधा आणि डॉक्टरांच्या मनमानी कारभामुळे मृतदेहाचे शासकीय दवाखान्यात नऊ तासांनंतर शवविच्छेदन करण्यात आले. कागदपत्रांची सोपस्कार पूर्ण केल्यानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
अलिबाग तालुक्यातील महाजने येथील केशव औचटकर या 80 वर्षीय वयोवृद्धाचा मृतदेह एका शेताजवळ जंगलभागात असल्याची माहिती रेवदंडा पोलिसांना मिळाली. पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पडवळ, सहाय्यक फौजदार अशोक पाटील, पोलीस नाईक सचिन वाघमारे, राकेश मेहत्तर आदींनी घटनास्थळी धाव घेतली. रेवदंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह नेण्यात आला. मात्र, तेथील डॉक्टरांनी शवविच्छेदन करण्यासाठी व्यवस्था नसल्याचे कारण सांगून अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यास पाठविले.
वयोवृद्धाचा मृतदेह घेऊन त्यांचे नातेवाईक अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात आले. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मृतदेह रुग्णालयातील शवविच्छेदन कक्षात आणला. मात्र, रेवदंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. यादव त्याठिकाणी वेळेत पोहोचले नाहीत. यादव यांना वारंवार संपर्क साधला, काही मिनिटात येतो, अर्ध्या तासात येतो, असे सांगून त्यांनी वेळकाढूपणा केला. जवळपास दहा तास उलटून गेले असल्याने मृतदेह कुजण्याच्या परिस्थितीत होता. त्यामुळे मृतदेहाला वास येऊ लागला. रुग्णालयातील पोलीस कर्मचारी प्रयाग वारगे यांनी डॉक्टर यादव यांच्याशी संपर्क साधून तातडीने येण्याची विनंती केली. रात्री नऊनंतर डॉक्टर अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात पोहोचले. त्यांनी शवविच्छेदन करण्याऐवजी मृतदेह मुंबईत शवविच्छेदनासाठी पाठवावा लागेल, असे सांगून मनमानी कारभार सुरु केला. अखेर पोलीस कर्मचारी प्रयाग वारगे यांच्या मध्यस्थीनंतर डॉ. यादव यांनी शवविच्छेदन करण्यास होकार देत रात्री दहानंतर शवविच्छेदन केले.त्यानंतर सर्व कागदोपत्री प्रक्रिया पार पाडल्यानंतर साडेअकरा ते पावणे बाराच्या दरम्यान मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या या मनमानी कारभारामुळे वयोवृद्धाच्या मृतदेहाची अवहेलना होत असताना त्यांच्या नातेवाईकांचेदेखील प्रचंड हाल झाले.
रेवदंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. यादव यांच्याविरोधात यापूर्वीदेखील नोटीस बजावून कारवाई केली आहे. रुग्णांना चांगल्या सुविधा कशा मिळतील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वयोवृद्धाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास उशीर का झाला, याबाबत त्यांच्याकडून खुलासा मागवून कारवाई केली जाईल.
डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग
रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी कर्मचारी नव्हता, त्यामुळे बोर्ली येथील रुग्णालयातून कर्मचाऱ्याची मागणी केली. परंतु, तो उपलब्ध झाला नाही. त्यामुळे अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात मृतदेह पाठविण्यात आला. आधीच एका मृतदेहाचे शवविच्छेदन याठिकाणी सुरू असल्याने संबंधित मृतदेहाच्या शवविच्छेदनास विलंब झाला.
डॉ. राकेश यादव, वैद्यकीय अधिकारी, रेवदंडा