पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांसाठीचे मतदान नुकतेच पूर्ण झाले आणि त्याचा निकाल गुरुवारी 10 मार्च रोजी लागेपर्यंत कोणत्या राज्यात कोणाची सत्ता येणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. तथापि, तोवर या मतदानातून मतदारांनी कोणाला पसंती दिली आहे, कोणता संदेश दिला आहे, याचा अंदाज घेण्यासाठी मतदान पूर्ण झाल्यानंतर चाचण्या घेण्यात येतात. त्यानुसार जाहीर करण्यात आलेल्या मतदानोत्तर चाचण्यांच्या सर्वेक्षणाची सगळीकडे चर्चा आहे. कारण एक तर या पाच राज्यांतील विधानसभांना मिनी लोकसभा असे संबोधण्यात आले होते. तसेच, या चाचण्यांतून अनेक आडाख्यांना धक्का बसलेला दिसतो तर बरेच अंदाज चुकीचे ठरतील असे चित्र उमटत आहे. सर्वांत चर्चेच्या उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत सत्तारूढ भारतीय जनता पार्टीला समाजवादी पक्षाच्या आघाडीने मोठे आव्हान उभे केल्याचे चित्र गेल्या दोन महिन्यांत उभे राहिले होते. उत्तर प्रदेश जिंकतो तो लोकसभा जिंकतो असा एक सिद्धांत आहे. त्यामुळे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला 2024 मध्ये तिसर्यांदा सत्ता प्राप्त करायची असल्यास उत्तरप्रदेश राखणे आवश्यक आहे. या कलचाचण्यांवरून भाजप सत्ता राखेल असे दिसते. तसेच, पंजाबमध्ये सत्तांतर होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उत्तराखंड आणि गोवा या दोन राज्यांत त्रिशंकू स्थिती राहील असे या कलचाचण्यांतून दिसून येत आहे तर मणिपूरमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळतील असा मतदारांचा कौल असू शकेल, असे या चाचण्यांतून दिसते. उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या जागांमध्ये गेल्या विधानसभेच्या तुलनेत मोठी घट होईल असा अंदाज असून तरीही तेथील 403 जागा असलेल्या विधानसभेत जवळपास 240 जागा मिळवून भाजपा बहुमत प्राप्त करेल, असा अंदाज या चाचण्यांतून व्यक्त होतो. समाजवादी पक्षाने दिलेल्या तगड्या टक्करीचीही नोंद या चाचण्यांत उमटली असून समाजवादी व अन्य पक्षांची आघाडी जवळपास 150 च्या आसपास जागा मिळवतील, असा अंदाज आहे. आम आदमी पक्ष बहुमताचा 59 हा आकडा पार करेल का हा प्रश्न असून तो सत्ताधारी काँग्रेसला बाजूला करेल आणि त्यात एकूण 117 पैकी 51 ते 75 जागा जिंकू शकेल, असे भाकित करण्यात आले आहे. पंजाबमध्ये देशभर चर्चेचा विषय बनलेली पक्षांतर्गत गटबाजी पाहता काँग्रेच्या चांगल्या कामगिरीची फार अपेक्षा नाहीच. प्रत्यक्षात या पाच राज्यांत काय घडते हे दोन दिवसांनंतर स्पष्ट होईलच, परंतु गेल्या काही वर्षांत देशातील सेफोलॉजी अर्थात मतदानशास्त्राचा बराच विकास झाला आहे. सुरुवातीच्या काळात त्यांना थट्टेवारी नेण्यात येत होते, तसेच मतदानोत्तर कल म्हणजे चूकच असे समजले जात होते, परंतु त्यात सुधारणा होत गेल्या आणि अनेक संस्था अशा प्रकारे मतदारांच्या मनात शिरून राजकीय भविष्यवाणी करण्याच्या व्यवसायात उतरलेल्या आहेत. गेल्या काही वर्षांत देशात कोठेही आणि कोणत्याही प्रकारच्या निवडणुका झाल्या की त्याचा निकाल लागेस्तोवर काय निकाल लागलेला असू शकेल याची मोठी चर्चा होत असते. माणूस हा एक सामाजिक प्राणी आहेच तसा तो राजकीय देखील आहे अशी मांडणी काही तत्वज्ञांनी केलेली आहे. त्यानुसार त्याला राजकीय भवितव्य ठरवणार्या पंचायत, पालिका पासून विधानसभा, लोकसभेपर्यंतच्या निकालाची उत्सुकता असते. शिवाय काय होईल याचे कुतुहल सगळ्यांनाच असल्याने तसेच अनेकांचे आपापले तर्कवितर्क आणि आखाडे असल्याने ते किती बरोबर येतात किंवा चुकतात याविषयीही खूप औत्सुक्य असते. खाजगी टेलिव्हिजनचा उदय होण्यापूर्वी तसेच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणेचा विकास होण्यापूर्वी विधानसभा आणि लोकसभेचा निकाल लागेपर्यंत अनेक दिवस जायचे. बुथनुसार कागदावर उमटवलेल्या शिक्क्यांची मोजणी व्हायची. त्यानुसार फेरीनुसार निकाल केवळ वर्तमानपत्रातून जाहीर व्हायचे. लोक नाक्यावर किंवा चहाच्या टपरीवर त्यावर चर्चा करायचे. त्यावेळी मतदानोत्तर चाचण्या व्हायच्या नाहीत. तथापि, आज अनेक मोठे वृत्तसमूह यात उतरले असून जनता या काळात निकाल लागेस्तोवर दूरचित्रवाणी संचाला डोळे चिकटवून बसलेली असते याची त्यांना कल्पना आहे. त्यामुळे साहजिक ही फार मोठी आर्थिक उलाढालीची बाब असल्याने मोठ्या फायद्याचीही गोष्ट आहे. सर्वेक्षण संस्था अनेक असल्या आणि त्यांचे सगळेच अंदाज बरोबर ठरत नसले तरी ते अधिकाधिक यशस्वी होत आहेत असे दिसते. त्यामुळे दोन दिवसांनंतरचे प्रत्यक्ष निकाल या संस्थांसाठीही चाचण्या ठरतील, यात शंका नाही.
मतदानोत्तर चाचण्या

- Categories: संपादकीय, संपादकीय
- Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Related Content
अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
by
Sanika Mhatre
March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
by
Sanika Mhatre
March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
by
Sanika Mhatre
March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
by
Sanika Mhatre
March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
by
Sanika Mhatre
March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
by
Sanika Mhatre
March 8, 2026