| अलिबाग | वार्ताहर |
नागाव पोस्टाचे सब पोस्टमास्टर इस्माईल हमदुले यांचा कर्मचार्यांच्यावतीने सेवानिवृत्ती कार्यक्रम हॅप्पीनेस स्नेहालीला रिसॉर्ट येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला नागाव ग्रामपंचायत सरपंच हर्षदा मयेकर, निखिल मयेकर, रायगड डाक अधीक्षक सुनील थळकर, सहाय्यक अधीक्षक सुनील पवार व अलिबाग पोस्टमास्टर संजय सळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी शाकिल कडू, सैफ्फूदिन फिरफिरे, स्मिता जवळे, विद्या घोडिंदे, कुंटे मॅडम, संजय केळकर, रमेश केराम, सुनील नांदगावकर, प्रवीण साळुंखे, गिरीष जोशी, सुरेश खडपे यांनी हमदुले यांच्याविषयीचे आपले मनोगत व्यक्त केले. दरम्यान, यावेळी इस्माईल हमदुले यांचा डाक अधीक्षकांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन सपत्नीक गौरव करण्यात आला. कार्यक्रमास संबोधित करताना इस्माईल हमदुले यांना गहिवरून आले. या कार्यक्रमास महाड, इंदापूर, माणगाव, पुणे, कोलाड, पेण, मुरूड येथील कर्मचार्यांची उपस्थिती पाहून ही माझ्या चाळीस वर्षांच्या केलेल्या कामाची पोहोच पावती आहे, असे ते म्हणाले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संजय राणे व त्यांच्या टीमने चोख कामगिरी बजावली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराधा पेणकर यांनी केले.