माजी पालकमंत्र्यांच्या निधीवाटपाला स्थगिती

रायगडात शिंदे सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये
20 कोटींचा पर्यटन विकास निधी रोखला

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
राज्यात सत्तांतर झाल्याने आता मागील सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती देण्यात येऊ लागली आहे. याचा फटका रायगडच्या माजी पालकमंत्री अदिती तटकरे यांनाही बसला असून, मंत्रिपदाच्या अखेरच्या दिवशी केवळ आपल्याच मतदार संघात 20 कोटींचा पर्यटन विकासनिधी देणार्‍या निर्णयाला तातडीने स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि सत्ताधारी शिंदे गट यांच्यात राजकीय घमासाम निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सत्तांतर होऊन आपले मंत्री पद जाण्याआधीच शेवटच्या दिवशी राज्यमंत्री तथा पालकमंत्री अदिती तटकरे यांनी जिल्ह्यातील इतर तालुक्यांना उपेक्षित ठेवून प्रादेशिक पर्यटन विकास योजनेचा निधी आपल्या मतदारसंघातील तळा, माणगाव, श्रीवर्धन, म्हसळा, रोहा तालुक्यात देण्याचा पराक्रम केला आहे. यातील 20 कोटी 37 लक्ष निधीस प्रशासकीय मंजूरी तर रु.16 कोटी 22 लक्ष निधी वितरीत देखील करण्यात आला होता.

राज्यातील सत्ता अस्थिर असतानाच जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्याचा खटाटोप जिल्ह्यातील इतर आमदारांनी यशस्वी होऊ न दिल्याने पालकमंत्री अदिती तटकरे अस्वस्थ झाल्या होत्या. त्यामुळे त्यांनी त्याच दिवशी विकास कामांच्या आढावाखाली बैठक आयोजित केली होती. त्यानंतर अखरेच्या दिवशी 29 जून रोजी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेचा तब्बल 20 कोटी 37 लाख रुपयांच्या निधीला मंजूरी दिली. तर रु.16 कोटी 22 लक्ष निधी वितरीत देखील केला. मात्र हा निधी जिल्ह्यातील इतर कुठल्याही भागात न देता फक्त आपल्याच श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील तळा, माणगाव, श्रीवर्धन, म्हसळा, रोहा या तालुक्यातच देऊ केला आहे.

त्यामुळे जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात असून हा तसेच शेवटच्या टप्प्यातील घेण्यात आलेले सर्व निर्णय तपासून रद्द करण्याची मागणी केली जात होती. त्याची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व निर्णयांना स्थगिती दिल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. आढावा घेऊन निधीचे योग्य ते वाटप केले जाणार असल्याचे बोलले जाते.

Exit mobile version