रेवदंड्यातील खड्डा मृत्यूचा सापळा

| रेवदंडा | प्रतिनिधी |


रेवदंडा बाजारपेठेतील रेवदंडा अर्बन बँकेसमोरील मुख्य रस्त्यावर भला मोठा खड्डा पडला आहे. हा खड्डा भला मोठा, रुंद आणि खोल आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे हा खड्डा पूर्णपणे पाण्याखाली गेला असून, त्याचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वार, रिक्षाचालक, चारचाकी वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे रेवदंडा ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे स्थानिकांमधून बोलले जात आहे.

रेवदंडा बाजारपेठेतील मुख्य मार्गावरून दररोज शेकडो नागरिक, विद्यार्थी आणि व्यापारी ये-जा करत असतात. परंतु, या रस्त्यावर पडलेला भला मोठा खड्डा पाण्याखाली दडल्याने अनेक दुचाकीस्वारांचा तोल जात आहे. सुदैवाने आतापर्यंत मोठी जीवितहानी टळली असली, तरी कोणत्याही क्षणी गंभीर अपघात होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे हा धोकादायक खड्डा रेवदंडा ग्रामपंचायतीच्या अगदी हाकेच्या अंतरावर असूनही त्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, इतक्या महत्त्वाच्या ठिकाणी असलेला हा खड्डा संबंधितांच्या नजरेतून सुटणे अशक्य आहे.

तरीही त्यावर कोणतीही तात्पुरती उपाययोजना, इशारा फलक किंवा सुरक्षेची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे रेवदंडा ग्रामपंचायतीने तातडीने संबंधित विभागाशी समन्वय साधून या धोकादायक खड्ड्याची दुरुस्ती करावी, तोपर्यंत सुरक्षेसाठी बॅरिकेड्स व इशारा फलक लावावेत, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या समस्येकडे आता तरी ग्रामपंचायतीने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Exit mobile version