| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
हरिहरेश्वर जसवली फाटा ते श्रीवर्धन मार्गावरील आराठी येथे असलेल्या रॉयल रेसिडेन्सी समोर जवळजवळ तीन महिन्यांपासून पाण्याची पाईपलाईन फुटलेली आहे. सुरुवातीला या फुटलेल्या पाईपलाईनमधून अत्यंत कमी प्रमाणामध्ये पाणी गळत होते. याबाबत ‘कृषीवल’च्या प्रतिनिधींनी मुख्याधिकाऱ्यांना अनेक वेळा कळविले होते. परंतु, दरवेळी पाईपलाईन दुरुस्त करण्याचे केवळ आश्वासन मिळाले. मात्र, आता पाईपलाईन मधून जास्त प्रमाणात पाणी गळत असून, त्या ठिकाणी चार ते पाच फुट खोल खड्डा तयार झाला आहे. या खड्ड्यात एखादी मोटरसायकल अडकली, एखादा लहान मुलगा पडला किंवा गंभीर अपघात घडला तर याला जबाबदार कोण? एखादी गंभीर दुर्घटना घडल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? असा असं संतप्त सवाल नागरिकांमधून केला जात आहे. त्यातच यंदा पावसाचे प्रमाण खूप कमी आहे. श्रीवर्धन शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या रानवली पाझर तलावामध्ये पाण्याचे प्रमाण देखील अत्यल्प आहे. भविष्यातील पाण्याची गरज ओळखून नगर परिषदेने पाणी वाचवण्याची आवश्यकता आहे. परंतु, अनेक वेळा ही बाब नगरपरिषदेच्या लक्षात आणून दिल्यानंतर देखील दुरुस्तीची कामे का करण्यात येत नाहीत? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
पाणी गळतीमुळे रस्त्याला खड्डा
