| दिघी | वार्ताहर |
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतनला कोंढे धरणातील पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटल्याने दोन दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा पूर्णता बंद झाला होता. त्यामुळे भर पावसात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण सुरू होती. मात्र, ग्रामंचायतीच्या अथक प्रयत्नांना अखेर यश आल्याने पाणी पुरवठा सुरळीत झाला आहे.
तालुक्यातील बोर्लीपंचतन शहराच्या वाढत्या लोकसंख्येपुढे पाण्याची समस्या कायम आहे. येथे कोंढेपंचतन एक व कार्ले येथील दोन योजनेतून धरणातील पाणी विहिरीत साठवण होऊन पाईप लाईनने दीड ते दोन किलोमीटर अंतरावरून पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र, ही पाईपलाईन वारंवार फुटत असल्याने शहराला पाणीपुरवठा होत नाही. पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईन ही अचानक फुटल्याने पाणीपुरवठा बंद झाला होता. त्यामुळे ऐन पावसाळ्यात गेले दोन दिवस नागरीकांचे पिण्याच्या पाण्यावाचून हाल झाले होते. काही ग्रामस्थ जवळच असणाऱ्या कार्ले नदीवरुन टेम्पोने पाणी आणून आपली गरज भागवत असताना, भर पावसात भीषण पाणी टंचाई ने गावकरी त्रस्त झाले होते. ग्रापंचायतीने युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम पूर्ण करून पाणी संकट दूर केले आहे.
पाईपलाईनची दुरुस्ती करण्यासाठी काही तांत्रीक अडचणी येत होत्या. त्यात दिवसभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे दुरुस्तीच्या कामातही व्यत्यय येत होता. परंतू दोन दिवसांच्या प्रयत्नाने दुरुस्तीचे काम पुर्ण झाले असून, गावचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी आम्हाला यश आले.
ज्योती परकर, सरपंच