चिल्हार नदीवरील किकवी पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील चिल्हार नदीवर किकवी येथे असलेलया पुलाची दुरवस्था झाली आहे. या पुलावरील रस्ता खड्ड्यात हरवला असून, दोन महिन्यांपूर्वी त्या पुलाचा पृष्ठभाग नव्याने डांबर टाकून बुळबुळीत केला होता. मात्र, निकृष्ट डांबरीकरणामुळे पुलावरील डांबर वाहून गेली असून, त्यामुळे निर्माण झालेल्या खड्ड्यांचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागत आहे.

कशेळे-खांडस या राज्यमार्ग रस्त्यावर चिल्हार नदीवर किकवी येथे पूल आहे. त्या पुलाची सर्व बाजूंनी दुरवस्था झाली आहे. या पुलाचा वापर प्रामुख्याने खांडस नांदगाव भागातील ग्रामस्थ करीत असतात. कशेळेपासून खांडस, नांदगाव काही गावे आणि 30 आदिवासी वाड्या या पुलावर प्रवास करीत असतात. पूर्वी सुगावे येथून खांडस जाणारा रस्ता होता आणि त्या रस्त्याने वाहतूक होत होती. मात्र, दहा वर्षांपूर्वी अकॅडमी ऑफ डेव्हलपमेंट सायन्स या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात आला. त्यानंतर खांडस-नांदगाव भागाकडे वाहतूक किकवी येथील पुलावरून वळविण्यात आली. त्या ठिकाणी असलेल्या पुलावरील डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे असल्याने पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून, सळ्या उघड्या पडल्या आहेत. पुलाच्या रीलिंगचे अनेक भाग तुटले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण केल्याने किकवी पुलावरील पृष्ठभाग निखळून गेला असून पुलावर खड्डेच खड्डे बनले आहेत.
दरम्यान, या रस्त्याची शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ सुधारणा करावी, अशी मागणी मोरेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश केवारी यांनी केली आहे.

Exit mobile version