। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावरील पेज नदीवर असलेल्या वंजारवाडी पुलमार्ग खड्ड्यांमुळे धोेकादायक बनला होता. या समस्येची विविध माध्यमांद्वारे घेण्यात आलेली दखल आणि त्यासंदर्भाची भूमिका यामुळे या रस्त्यावरील खड्डे भरण्याच्या कामास सुरुवात झाली आहे.
कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर कडाव आणि कशेळे या दरम्यान पेज नदीवर वंजारवाडी येथे पूल आहे. त्या पुलावर आणि दोन्ही बाजूला असलेला रस्ता गेली अनेक महिने खराब अवस्थेत आहे. याबाबत स्थानिक तरुण कृष्णा जाधव आणि कृष्णा शिंगोळे यांनी सोशल मीडियावर त्याबाबत माहिती दिल्यानंतर माध्यमांनी त्याची दखल घेतली होती. राज्य रस्ते विकास महामंडळ कडून वंजारवाडी येथील पुलाची दुरुस्ती सुरु केली आहे. रस्त्यावरील खडबडीत भाग काढून टाकण्यात आले असून त्यावर आरएमसी सिमेंट आणून पुलाचा पृष्ठभाग नव्याने दुरुस्त करण्यात आला आहे.