संकेत कोतवाल यांच्या मृत्यूनंतर रोहा- नागोठणे मार्गावर ठिय्या; जनआक्रोशानंतर प्रशासन झुकले
| चणेरा | प्रतिनिधी |
रोहा रेल्वे उड्डाणपुलाखालील रखडलेल्या उड्डाणपूल आणि जोडरस्त्याच्या निकृष्ट अवस्थेने आणखी एका निष्पाप जीवाचा बळी घेतला. भातसई गावचे पोलीस पाटील संकेत जनार्दन कोतवाल (32) यांचा गुरुवारी (दि.9) भीषण अपघातात जागीच मृत्यू झाल्यानंतर रोहा शहरासह परिसरात संतापाची प्रचंड लाट उसळली. त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि. 10) शेकडो ग्रामस्थ, महिला, नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी रोहा–नागोठणे मार्गावर ठिय्या आंदोलन व रास्ता रोको करत प्रशासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, संकेत कोतवाल हे दुचाकीवरून रोहाकडे जात असताना रेल्वे उड्डाणपुलाखालील मोठ्या खड्ड्यात वाहनाचा तोल गेला. ते रस्त्यावर पडताच पाठीमागून येणारी एसटी बस त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर नातेवाईकांनी तब्बल 18 तास मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची आणि कठोर कारवाईची मागणी केली. आंदोलनादरम्यान नागरिकांनी, “आणखी किती निष्पाप जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार?” असा संतप्त सवाल उपस्थित करत रखडलेले उड्डाणपूल आणि जोडरस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. रेल्वे प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळेच हा दुर्दैवी प्रकार घडल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला.
विशेष म्हणजे, आंदोलनकर्त्यांनी सामाजिक जबाबदारीचे भान राखत शाळकरी विद्यार्थ्यांची वाहने, रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक वैद्यकीय सेवा देणाऱ्या वाहनांना मार्ग मोकळा करून दिला.
स्थानिकांच्या मते, गेल्या चार वर्षांपासून रोहा–अष्टमी रेल्वे उड्डाणपूल आणि जोडरस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. अपुरी सुरक्षा व्यवस्था, मोठमोठे खड्डे, अरुंद रस्ता, दिशादर्शक फलकांचा अभाव, रिफ्लेक्टिव्ह बोर्ड नसणे आणि रात्री अपुरा प्रकाश यामुळे या मार्गावर वारंवार अपघात होत असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तरीही संबंधित यंत्रणांनी कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. यापूर्वीही या प्रश्नावर अनेक आंदोलने झाली होती. 28 जुलै 2025 रोजी रिक्षा चालक–मालक संघटनेने आमरण उपोषण केले होते, तर 26 मे 2026 रोजी क्रांतिवीर सेना संघटनेने महारेलच्या महाव्यवस्थापकांकडे लेखी तक्रार करून सुरक्षा उपाययोजना आणि रखडलेले काम पूर्ण करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल झाला नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत, “भरपाई नको, न्याय हवा,” अशी भूमिका घेतली. दोषींवर कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या मान्य करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले. मात्र, केवळ आश्वासनांवर विश्वास न ठेवता प्रत्यक्ष कामाची अंमलबजावणी झाली नाही, तर यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. रोहा रेल्वे उड्डाणपूलाचा प्रश्न आता केवळ विकासाचा नसून नागरिकांच्या जीवित सुरक्षेचा बनला असून, संबंधित यंत्रणांनी तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी सर्व स्तरांतून मागणी होत आहे.
