| पनवेल | प्रतिनिधी।
कळंबोली मधील सेक्टर 10 मध्ये असलेल्या न्यू मुंबई इंग्लिश स्कूलच्या इमारतीच्या तळमजल्यामध्ये सापाचे पिल्लू दिसून आल्याने शाळेमध्ये एकच गडबड उडाली. शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. परंतु, कळंबोलीतील सर्पमित्र गणेश वत्रे यांनी त्वरित विद्यालयातील सापाचे पिल्लू पकडून बाटलीमध्ये बंद केले आणि नैसर्गिक अधिवासात सोडून त्याची मुक्तता केली.
कळंबोलीतील सेक्टर 10 मध्ये असलेल्या न्यू मुंबई इंग्लिश स्कूलच्या इमारतीमध्ये आज सकाळी अडीच फूट लांबीचे सापाचे पिल्लू आढळून आले. सदरची बाब विद्यालय प्रशासनाच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित कळंबोलीतील सर्पमित्र गणेश वत्रे यांच्याशी संपर्क साधला. गणेश वत्रे यांनी त्वरित विद्यालयात धाव घेऊन लपून बसलेले धामण जातीचे सापाचे पिल्लू पकडून बाटलीमध्ये बंद केले अन नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. विद्यालयाच्या बाजूला उद्यान असल्या कारणामुळे या उद्यानामध्ये या धामण जातीच्या प्रजातीची पिलावळ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याची पिले आजूबाजूला असल्याचा अंदाज यावेळी सर्पमित्रांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे यापुढे विद्यालयाच्या आजूबाजूला योग्य ती पाहणी करूनच विद्यालयाने विद्यालयातील विद्यार्थ्यांचे संरक्षण करण्याचा सल्ला यावेळी सर्प मित्राने विद्यालय प्रशासनाला दिला आहे.






