आगरदांडा रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

कोर्लई । प्रतिनिधी ।

मुरुड तालुक्यातील आगरदांडा ते नांदले रोह्याकडे आगरदांडा गावातून जाणाऱ्या रस्त्याची अनेक ठिकाणी खाच खळगे व खड्ड्यांमुळे पार दुरावस्था झाली आहे. मात्र, याकडे संबंधित बांधकाम खात्याचे दुर्लक्ष असल्याबद्दल वाहनचालक व नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तातडीने खड्डे बुजविण्याची मागणी ग्रामस्थ सलिम अर्जबेगी यांनी केली आहे.

मागील पावसाळ्या पासून या रस्त्यावर खड्डे पडले असून, गावातील बापदेव मंदिर भागात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या ठिकाणी काही जणांना अपघाताला सामोरे जावे लागले तर वेळप्रसंगी कोणत्याही क्षणी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत येथील ग्रामपंचायत, सलिम अर्जबेगी ग्रामस्थ यांनी बांधकाम खात्याकडे वेळोवेळी रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली असून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष दिसून येते आहे. शासनाच्या संबंधित बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी यात तातडीने लक्ष पुरवून आगरदांडा गावातून नांदले रोह्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खाच खळगे व खड्डे बुजवून डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.

Exit mobile version