मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात खड्डेच-खड्डे

। पोलादपूर । शैलेश पालकर |

मुंबई गोवा महामार्गावरील रायगड हद्द ते रत्नागिरी प्रवेशद्वार असलेल्या कशेडी बंगला येथे रायगड रत्नागिरी सीमावर्ती भागामध्ये तसेच जवळच्याच यूटर्नवरील वळण रस्त्यावर रत्नागिरी हद्दीत मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून वाहनचालकांना खड्डेच खड्डे असा अनुभव घेताना गेला रस्ता कुणीकडे असा प्रश्‍न पडल्याचे दिसून येत आहे.

कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गातून छोटया वाहनांची ये-जा सुरू आहे. मात्र, आजही अनेक अवजड वाहनांसह एसटी बस व इतर वाहने कशेडी बंगला मार्गे कोकणात व मुंबईकडे ये-जा करीत असल्याने गणेशोत्सवापूर्वी घाटरस्त्यावरील खड्डे भरण्याची मागणी प्रवासी वर्गाकडून करण्यात येत आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम 2009 सालापासून रखडलेले आहे. यंदाच्या पावसाळयात कशेडी घाटातील राष्ट्रीय महामार्ग खड्डेमय झाला असून संततधार पडणार्‍या पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे वाढत आहेत. यामुळे वाहने नादुरूस्त होऊन अनेकदा वाहतूक कोंडीचा त्रास प्रवासी जनतेला सहन करावा लागत आहे. गणेशोत्सवादरम्यान मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी 2023 मध्ये कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गापैकी एक भुयार कोकणात जाण्यासाठी एकेरी मार्ग म्हणून सुरू करण्यात आली.

कशेडी बंगला हा रायगड व रत्नागिरी जिल्हा सीमेवर असल्याने रायगड हद्दीतील भोगावजवळ रस्ता सोडल्यास पोलादपूर ते कशेडी रस्ता चांगला व वाहतुकीस योग्य आहे. मात्र रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करतानाच 200 मीटर अंतरापर्यंत खड्डेच खड्डे असे प्रवाशांचे स्वागत होत असून खेड तालुक्यातील अनुसया ढाब्याजवळ व तत्पूर्वीच्या जुन्या मार्गावर खड्डे आणि त्यानंतर सिमेंट काँक्रिटचा पक्का रस्ता असल्याने वाहतुकीचा वेग वाढत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, कातळी भोगावच्या भुयारी मार्गाकडे जाण्यासाठीच्या रस्त्यापासून कशेडी घाटातून थेट खवटीच्या पुढे खेड तालुक्यातील भुयारी मार्गाच्या दुसर्‍या बाजूला सिमेंट काँक्रिटचा रस्ता सुरू होईपर्यंत प्रवाशांना खड्डेच खड्डे आणि गेला रस्ता कुणीकडे असा अनुभव घ्यावा लागत आहे.

Exit mobile version