प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष
। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ गावातील रस्त्यांवर काही ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यातच मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे खड्ड्यांचे प्रमाण वाढत असून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि नेरळ विकास प्राधिकरण यांनी या रस्त्याची डागडुगी करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत अशी ओळख असलेल्या नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. शहरातील रस्ते खड्डेमय झाले असून त्या रस्त्यातून नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. रस्त्यावरील मोठं मोठ्या खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरु आहे. नेरळ मातोश्री नगरच्या प्रवेश द्वाराजवळ कोल्हारे रोडवर मोठा खड्डा पडला आहे. मुसळधार पाऊस पडत असल्याने ते खड्डे पाण्याने भरतात. यामुळे या खड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे अनेक दुचाकींचा अपघात होत आहे.
तसेच, नेरळ-कळंब मार्गावरील गंगानगर येथील रस्त्यावर देखील मोठे खड्डे पडले आहेत. पावसाळा सुरु होऊन फक्त एक महिना झाला असून शहरातील रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्यामध्ये खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. पावसाचे पाणी या खड्ड्यांमध्ये साचले असल्याने या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना प्रवास करताना त्रासदायक ठरत आहे. मागील काही दिवसांत या खड्ड्यांमुळे अनेक विचित्र अपघात घडले आहेत.
नेरळ गावातील मुख्य सर्व रस्ते मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडून करण्यात आले. त्या काँक्रीटच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले असून त्या खड्ड्यांची दुरुस्ती एमएमआरडीएने करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. हेटकर आळी भागात पडलेले खड्डे चुकविण्यासाठी वाहनचालक चुकीच्या मार्गाने वाहने चालवतात आणि त्यामुळे तेथे मोठा अपघात होऊ शकतो. तर, नेरळ गावातील काही रस्ते नेरळ विकास प्राधिकरण कडून करण्यात आले आहेत. हे लक्षात घेऊन नेरळ प्राधिकरण आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाने रस्त्याची दुरुस्ती तात्काळ करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.