निर्माणाधीन उड्डाणपुलांच्या रस्त्याची चाळण

। पालघर । प्रतिनिधी ।

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील निर्माणाधीन उड्डाणपुलांलगतचे सेवा रस्ते वाहतूक कोंडीला कारण ठरत आहेत. महामार्गावरील व्हाईट टॉपिंगचे काम बंद झाल्यानंतर वाहतूक कोंडीतून सुटका होण्याची शक्यता फोल ठरली आहे. निर्माणाधीन उड्डाणपुलांच्या सेवा रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

जव्हार फाटा आणि नांदगाव फाट्यावरील उड्डाणपुलाच्या निर्मितीच्या ठिकाणी दोन्ही बाजुंनी दोन पदरी सेवा रस्ते तयार करण्यात आले आहे. यानंतर सेवा रस्त्यांवर वाहतूक वळवल्यानंतर उड्डाणपूल उभारणीच्या कामाला सुरुवात केली होती. सातीवलीच्या उड्डाणपुलाच्या ठिकाणी जुन्या सेवा रस्त्यावर कोणतेही दुरुस्तीचे काम न करता वाहतूक सेवा रस्त्यावर वळवून उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले होते. जून महिन्याच्या अखेरीस झालेल्या पहिल्या पावसात तिन्ही निर्माणाधीन उड्डाणपुलांच्या ठिकाणच्या सेवा रस्त्यांवर खड्डे पडण्यास सुरुवात झाली होती. खड्डे दुरूस्तीच्या कामाकडे ठेकेदाराकडून दुर्लक्ष करण्यात आल्याने खड्ड्यांची संख्या वाढत जाऊन सेवा रस्त्यांची चाळण झाली.

Exit mobile version