। महाड । प्रतिनिधी ।
राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडाकडे जाणार्या मार्गाचे नूतनीकरण सुरू आहे; मात्र तरीही नाते खिंडीपासून अनेक ठिकाणी रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताची संख्या वाढली आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराला खड्डे भरण्याचे आदेश तातडीने द्यावेत, अशी मागणी रायगड विभागातील ग्रामस्थांसह लाडवली येथील सामाजिक कार्यकर्ते इलीयास ढोकले यांनी लेखी निवेदनाद्वारे कार्यकारी अभियंता आकांक्षा मेश्राम यांच्याकडे केली आहे.
मागील वर्षापासून सिमेंट काँक्रीटच्या कामाला वेगात सुरुवात झाली आहे. तथापि, मागील दोन वर्षांत झालेल्या पावसाने व एकवीस सालातील महाप्रलयाने रस्त्याची पुरती दुर्दशा झाली असून, नाते खिंड या मार्गाच्या प्रवेशद्वारापासूनच अनेक ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमध्ये मोटारसायकल, विक्रम रिक्षांचे अपघात झाल्याच्या घटना घडल्या होत्या.
या अपघातांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग विभागाने तातडीने हे खड्डे भरण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला द्यावे तसेच झालेल्या कामाच्या ठिकाणीदेखील सुरक्षेसंबंधात बॅनर व कॅट आइज तसेच रेडियम दिवे रात्रीदरम्यान प्रवास करणार्या शिवभक्त ग्रामस्थांकरिता लावण्याची मागणी इलियास ढोकले यांनी या निवेदनाद्वारे केली आहे. कार्यकारी अभियंता आकांक्षा मेश्राम यांनी यावेळी झालेल्या अनौपचारिक चर्चेमध्ये आपण तातडीने यासंदर्भात संबंधित ठेकेदाराला खड्डे भरण्याबाबत सूचना देऊ असे स्पष्ट केले.