महामार्गावरील खड्ड्यांचे उद्योगांवर विघ्न

रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग; जिल्ह्याच्या विकासासाठी मोठी अडचण

| माणगाव | सलीम शेख |

गेली तब्बल 17 वर्षे रखडलेला आणि सातत्याने चर्चेत असलेला मुंबई-गोवा महामार्ग सध्या रायगड जिल्ह्याच्या आर्थिक विकासासाठी मोठी अडचण ठरत आहे. महामार्गावरील खड्डे, वाहतूक कोंडी, अतिवृष्टी, महापूर आणि घाटमाथ्यावर वारंवार कोसळणाऱ्या दरडी यामुळे माणगावसह महाड, रोहा परिसरातील उद्योग, कारखानदारी, व्यापार आणि पर्यटन व्यवसायावर गंभीर परिणाम होत आहे. रस्ते वाहतुकीची अनिश्चितता निर्माण झाल्याने उद्योगांना कच्चा माल आणणे, तयार माल बाजारपेठेत पोहोचवणे तसेच ग्राहक आणि व्यापाऱ्यांची ये-जा करणे कठीण झाले आहे.

माणगावसह महाड आणि रोहा परिसरात अनेक छोटे-मोठे उद्योग व कारखाने कार्यरत आहेत. या उद्योगांचे दळणवळण मोठ्या प्रमाणात महामार्गावर अवलंबून आहे. मात्र, मुंबई-गोवा महामार्गाची दयनीय अवस्था, जागोजागी पडलेले मोठमोठे खड्डे आणि वाहतूक कोंडी यामुळे मालवाहतूक वेळेत होत नाही. वाहतूक विलंबामुळे उत्पादन खर्च वाढत असून, उद्योगांच्या कार्यक्षमतेवरही त्याचा परिणाम होत आहे. कच्चा माल वेळेत उपलब्ध न होणे, तयार माल बाजारपेठेत पोहोचण्यास विलंब होणे आणि वाहनांच्या देखभाल-दुरुस्तीचा वाढता खर्च यामुळे उद्योगांसमोर आर्थिक आव्हान निर्माण झाले आहे. महामार्गाची हीच परिस्थिती कायम राहिल्यास रायगडातील विद्यमान उद्योग टिकवणे आणि नव्या उद्योगांना आकर्षित करणे अधिक कठीण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

पावसाळ्यात रायगड जिल्ह्यातील घाटमार्गांची परिस्थिती अधिक गंभीर बनते. ताम्हिणी घाटात अतिवृष्टी झाल्यानंतर अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे रस्त्यांचे नुकसान झाले आहे. दरडी कोसळण्याची भीती आणि अचानक रस्ते बंद होण्याची शक्यता यामुळे वाहनचालकांमध्येही असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. तसेच, ताम्हिणी घाटात अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्याची वेळ आली आहे. आंबेनळी घाट आणि बोरघाटातही पावसाळ्यात वाहतुकीवर परिणाम झाल्याने मुंबई, पुणे आणि कोकण यांच्यातील दळणवळणावर त्याचा थेट परिणाम झाला. एखादा प्रमुख मार्ग बंद झाल्यानंतर पर्यायी मार्गांवर वाहनांचा ताण वाढतो आणि त्यातून पुन्हा वाहतूक कोंडी निर्माण होते.

तसेच, रायगड जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे. येथील समुद्रकिनारे, किल्ले, घाट, धबधबे, निसर्गरम्य ठिकाणे आणि धार्मिक स्थळे पाहण्यासाठी मुंबई, पुणे तसेच राज्याच्या विविध भागांतून पर्यटक मोठ्या संख्येने येतात. मात्र अतिवृष्टी, खड्डे, दरडी आणि रस्ते बंद होण्याच्या घटनांमुळे पर्यटकांच्या प्रवासाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. पर्यटकांची संख्या घटल्यास त्याचा सर्वाधिक फटका हॉटेल, लॉज, रिसॉर्ट, खानावळी, पर्यटन वाहनचालक, स्थानिक दुकानदार, फळ-भाजी विक्रेते आणि छोट्या व्यावसायिकांना बसतो. त्यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था ही केवळ वाहतुकीची समस्या राहिलेली नसून, ती स्थानिक अर्थव्यवस्थेशी जोडलेली गंभीर समस्या बनली आहे.
त्यामुळे महामार्ग हा केवळ रस्ता नसून, रायगडच्या उद्योग, व्यापार, पर्यटन आणि रोजगाराचा कणा आहे. हा कणा मजबूत झाला तरच रायगडचा औद्योगिक आणि आर्थिक विकास वेगाने होऊ शकतो. त्यामुळे महामार्गाच्या कामाला आता केवळ आश्वासनांची नव्हे, तर ठोस आणि कालबद्ध कृतीची गरज असल्याचे रायगडकरांमधून बोलले जात आहे.

नवीन उद्योगांना अडथळा
जिल्ह्यात औद्योगिक विकासासाठी मोठ्या संधी उपलब्ध असतानाही पायाभूत सुविधांची कमकुवत स्थिती हा मोठा अडथळा ठरत आहे. उद्योग सुरू करण्यासाठी वीज, पाणी, जमीन याबरोबरच सक्षम आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था अत्यावश्यक असते. महामार्गाची स्थिती अशीच राहिली तर नवीन उद्योगांनी रायगडला पसंती का द्यावी, असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. परिणामी रोजगार निर्मितीवरही त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.
कायमस्वरूपी उपाय कधी?
गणेशोत्सवाच्या काळात कोकणात मोठ्या प्रमाणात चाकरमानी दाखल होत असतात. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी या काळात अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घातली जाते. मात्र, हा तात्पुरता उपाय असून, महामार्गाची कायमस्वरूपी सुधारणा हाच यावरील प्रभावी मार्ग आहे. त्यामुळे महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करणे, खड्ड्यांची शास्त्रोक्त पद्धतीने दुरुस्ती करणे, घाटभागात दरड प्रतिबंधक उपाययोजना करणे, पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा करणे आणि वाहतूक व्यवस्थेचे प्रभावी नियोजन करणे गरजेचे आहे.
Exit mobile version