। चिरनेर । प्रतिनिधी ।
उरण तालुक्यातील चिरनेर ते कोप्रोली या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मार्गावर काही ठिकाणी खडी उखडून जीवघेणे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांचा प्रवास धोकादायक झाला आहे. या मार्गावरील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी चिरनेरचे माजी उपसरपंच सचिन घबाडी यांच्यासह येथील नागरिकांनी उरणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे दामोदर पाटील यांच्याकडे केली आहे.
मागील झालेल्या मुसळधार पावसामुळे या मार्गावरील खड्ड्यांची दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गावरील खड्डे आणखीनच खोल झाले असून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावर अनेकवेळा किरकोळ तसेच गंभीर अपघात देखील झाले आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षितेचा प्रश्न गंभीर झाला आहे.
दरम्यान, या मार्गावरून दररोज हजारो लहान मोठी वाहने तसेच औद्योगिक वाहतूक सुरू असते. त्यामुळे हा मार्ग उरण पूर्व विभागातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने या रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांची तातडीने दखल घेऊन त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी चिरनेरचे माजी उपसरपंच सचिन घबाडी यांच्यासह येथील नागरिकांनी केली आहे. उरण सार्वजनिक बांधकाम खात्याचे दामोदर पाटील यांनी घबाडी यांना या मार्गावरील खड्ड्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.
चिरनेर-कोप्रोली मार्गावरील प्रवास धोकादायक
