क्ले पेव्हर ब्लॉकच्या रस्त्याला खड्डेच खड्डे!

नगरपरिषद प्रशासन पाय मोडण्याची वाट पाहतेय का?; नागरकांकडून होतेय विचारणा

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरान या शहरात महात्मा गांधी मार्ग महत्त्वाचा रस्ता समजला जातो. या क्ले पेव्हर ब्लॉकचे रस्त्यातील काही पेव्हर ब्लॉक निखळले आहेत. त्यामुळे प्रामुख्याने दिवाडकर हॉटेल परिसरात रस्त्यावर खड्डे पडले असून, त्या त्या ठिकाणचे खड्डे भरण्याची कार्यवाही नगरपरिषद करीत नाही. त्यामुळे त्या खड्ड्यात पाय मोडण्याची वाट माथेरान नगरपरिषद पाहते आहे काय, असा संतप्त सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे.

माथेरान शहरात सर्वोच्य नायायालयाच्या आदेशाने आणि सनियंत्रण समितीच्या परवानगीने क्ले पेव्हर ब्लॉक साहाय्याने तयार करण्यात येत आहे. त्यातील दस्तुरी ते छत्रपती शिवाजी रोड हा शहरातील महत्त्वाचा रस्ता क्ले पेव्हर ब्लॉकपासून बनविला जात आहे. त्यात या रस्त्यावरील माथेरान स्टेशन ते टपाल पेटी नाका या भागात वर्षभरापूर्वी रस्त्यावर क्ले पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले आहेत. त्या पेव्हर ब्लॉकमधील अनेक पेव्हर ब्लॉक हे निखळले आहेत. त्यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे दिसून येत आहे. ते खड्डे पालिकेने मातीच्या सहाय्याने भरले होते. ते खड्डे आता आकाराने आहेत. त्यामुळे रस्त्यातील हे असंख्य खड्डे पर्यटक आणि स्थानिक यांच्यासाठी डोकेदुखी बनले आहेत.

आता पावसाळा सुरु झाला असून, रस्त्यावर पडलेले खड्डे हे आणखी धोकादायक बनले आहेत. त्या खड्ड्यात साचलेले पाणी यामुळे खड्डा किती खोल आहे याचा याचा अन्दाज येत नाही.त्यामुळे धोकादायक बनलेल्या खड्ड्यामध्ये पाय अडकून अपघात होण्याची शक्यता आहे. रात्रीच्या वेळी वीज खंडित झाल्यावर तेथून प्रवास करणार्‍या पर्यटकांचे पाय खड्ड्यात पडून मुरगळण्याची शक्यता आहे. त्यामुळे माथेरान नगरपरिषद खड्ड्यात पाय पडून अपघात होण्याची वाट पाहात आहे काय, असा संतप्त सवाल माथेरान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उपस्थित केला आहे. शहरात मलनिःसारण प्रकल्पाचे काम करण्यासाठी काढण्यात आलेले पेव्हर ब्लॉक पुन्हा लावण्यात आले आहेत. मग महात्मा गांधी रस्त्यावरील ते निखळलेले क्ले पेव्हर ब्लॉक नगरपरिषद का बसवत नाही? असा स्थानिकांचा मुख्य सवाल असून, त्या खड्ड्यात पाय मोडल्यानंतर नवीन पेव्हर ब्लॉक टाकणार आहे काय? माथेरान पालिकेच्या या भूमिकेमुळे माथेरान शहरात पालिकेचे क्ले पेव्हर ब्लॉक बद्दल दोन वेगवेगळे निर्णय पाहावयास मिळत आहेत.

Exit mobile version