अश्वपाल संघटना पुन्हा आक्रमक;दीड मीटर रस्त्याला विरोध
। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान या पर्यटन स्थळावर पर्यटक घोड्यावरून फिरण्यासाठी येत असतात. माथेरानचे पर्यटन खर्या अर्थाने घोड्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, त्याच घोड्यांना चालण्यासाठी आता रस्त्यासाठी आक्रमक भूमिका घेण्याची वेळ अश्वपालकांवर आली आहे. पर्यावरणपूरक धूळविरहित रस्ते बनविले जात असून, त्या क्ले पेव्हर ब्लॉकवरून घोड्यांचे पाय घसरण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे तीव्र उताराच्या ठिकाणी जांभा दगडाचे रस्ते बनविण्याच्या मागणीसाठी अश्वपाल संघटना आक्रमक झाली आहे. दरम्यान, अश्वपाल संघटनेने महात्मा गांधी या मुख्य रस्त्यावरील दीड मीटर लांबीच्या पेव्हर ब्लॉक रस्त्यावरून आक्रमक भूमिका घेत विरोध करण्यास सुरुवात केली आहे.
माथेरानमधील रस्ते सर्वांना सनियंत्रण समितीचे परवानगीनंतर पर्यावरणपूरक बनवले जात आहेत. या रस्त्यांपैकी दस्तुरी नाका ते शिवाजी महाराज चौक या महात्मा गांधी रस्त्यांचे क्ले पेव्हर ब्लॉक लावून धुळविराहित करण्याचे काम सुरू आहे. त्यात या रस्त्यावर असलेले तीव्र चढाव कमी करण्याची मागणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडून पूर्ण झाली आणि त्यानंतर साडे चार किलोमीटर लांबीचा रस्ता क्ले पेव्हर वापरून बनविण्यास सुरुवात झाली. मात्र क्ले पेव्हर लावल्यानंतर घोडे रस्त्यावर चालताना घसरू लागले आणि काही घोड्यांना अपघात देखील झाले. शेवटी स्थानिक अश्वपाल संघटनेने आक्रमक भूमिका काळोखी भागातील चढाव आणि तीव्र उतारावरून क्ले पेव्हर काढण्याची मागणी केली. तर दुसरीकडे माथेरान मधील व्यापारी संघटनेने क्ले पेव्हर रस्ता तयार झाल्यानंतर चालविण्यात येणार्या ई रिक्षासाठी माथेरान बंद ठेवून मोर्चा काढला.
गावातील दोन प्रवाह लक्षात घेवून आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे अश्व पालक पोहोचले आणि त्यानंतर प्राधिकरणबरोबर बैठक घेण्यात आली. त्या बैठकीला ज्यांची महत्त्वची तक्रार आहे त्या अश्वपाल संघटनेने बोलावले नाही आणि बैठक 2 नोव्हेंबर रोजी झाल्यानंतर त्या बैठकीत माथेरानचे प्रतिनिधित्व करणार्या पालिका मुख्याधिकारी आणि प्रशासक सुरेखा भणगे यांनी बैठकीची माहिती आपल्याला दिली नाही, असा आरोप अश्वपाल संघटना करीत आहे. बैठकीत काय ठरले आहे, रस्त्याचे नियोजन कसे असणार याबाबत अश्वपाल यांनी मुख्याधिकारी यांची भेट घेऊन माहिती मागितली होती, मात्र रस्त्याची सुधारणा करण्याचे काम सुरु होईपर्यंत माहिती देण्यात आली नव्हती.
त्यात आता दीड मीटर रुंदीचा रस्ता तयार केला जात असताना अश्वपालक काही आंदोलन करतील याची भीती असल्याने माथेरान नगरपरिषद कडून पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे. त्यास अश्वपाल संघटना यांचा आक्षेप असून सदर काम एमएमआरडीएकडून सुरु असताना माथेरान नगरपरिषदेचा पोलीस बंदोबस्त मागण्याचा अधिकार काय आणि कशासाठी पोलीस बंदोबस्तात कामे केली जात आहेत असा सवाल अश्वपाल संघटनेच्या जेष्ठ कार्यकर्त्या आशा कदम यांनी उपस्थित केला आहे.
स्थानिक अश्वपाल संघटनेच्या पदाधिकारी यांनी दिवसभरात माथेरान नगरपरिषद मुख्याधिकारी आणि प्रशासक सुरेखा भणगे, पोलीस ठाण्यात जाऊन सहायक पोलीस निरीक्षक शेखर लव्हे, कर्जत येथे जाऊन पोलीस उपाधीक्षक विजय लगारे यांची भेट घेऊन आपल्या समस्या सांगितल्या. त्यानंतर पालिकेच्या मुख्याधिकारी आणि प्रशासक सुरेखा भणगे यांनी पालिकेचे शहर अभियंता विश्वास विरंबोले आणि अश्वपाल संघटनेच्या कार्यकर्त्यांसह प्रत्यक्ष रस्त्याच्या कामावर जाऊन पाहणी केली आणि अश्वपालक यांची मागणी आपण तात्काळ मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता यांना लेखी स्वरूपात कळवू असे आश्वासन दिले आहे. मात्र, अश्वपालक यांच्याकडून काम बंद करण्यासाठीप्रसंगी आंदोलन केले जाऊ शकते यामुळे माथेरान पोलीस ठाणे यांच्याकडूनदेखील पोलीस बंदोबस्त या कामासाठी पुरविण्यात आला आहे. त्यामुळे माथेरानमध्ये सध्याच्या गुलाबी थंडीत रस्त्याच्या सुधारणेच्या कामावरून अश्वपाल संघटना आक्रमक झाली असून, वातावरण गरम झाले आहे.
याबाबत स्थानिक अश्वपाल संघटनेचे रस्ता असलेले म्हणणे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी ऐकून घेतले नाही तर मात्र आम्ही आंदोलन करू. त्यात रस्ता रोको तसेच उपोषण करण्याचा निर्णय स्थानिक सर्व अश्वपालक यांनी घेतला आहे.
आशा कदम, स्थानिक अश्वपाल संघटना