। माणगाव । प्रतिनिधी ।
कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थपन यंत्रणा (आत्मा) व प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व विकास दिप संस्था, माणगाव येथे बुधवार, दि. 29 जून रोजी आदिम जमाती विकास व संवर्धन या योजनेंतर्गत शेळीपालन, कुक्कुटपालन व व्यवस्थापन या विषयाचे प्रशिक्षण घेण्यात आले.
या प्रशिक्षणासाठी आदिवासी विकास निरीक्षक माणगाव प्रज्ञा मोरे आदिवासी महिला शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले. यावेळी तालुका कृषी अधिकारी माणगाव आर.डी. पवार यांनी आदिवासी शेतकरी महिलांना शेळीपालन व कुक्कुटपालनाच्या विविध योजना, बाजारातील वाढती मागणी, कुक्कुटपालन व शेळीपालनाची भविष्याची गरज आदींबाबत माहिती दिली,
तसेच सतीश भोसले व त्यांचे सहकारी स्वदेश फाऊंडेशन, लोणेरे यांनी कोंबड्यांच्या विविध जाती, अर्थकारण, खाद्य व्यवस्थापन, लसीकरण इत्यादीबाबत सांघिक खेळ, प्रात्यक्षिके दाखवून मार्गदर्शन केले, तसेच महेश मोरे समन्वयक सर्व विकास दिप संस्था, माणगाव यांनी आदिवासी बांधवांनसाठी कुक्कटपालन व शेळीपालन व्यवसाय कसा फायदेशीर आहे याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणाचे नियोजन प्रमोद शिंदे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा, माणगाव यांनी केले. या प्रशिक्षणासाठी तालुक्यातील महिला शेतकरी गटाचे 65 सभासदांनी उपस्थित राहून प्रशिक्षणाचा लाभ घेतला. या प्रशिक्षणासाठी मेल रॉयसह संचालक, सर्व विकास दिप संस्था, माणगाव, कृषी पर्यवेक्षक राजाराम शिंदे, कृषी सहाय्यक शेंडे, ठाकरे, स्वदेश फाऊंडेशनचे मार्गदर्शक उपस्थित होते. यावेळी उपस्थित महिलांना कोंबडी पिल्लांचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.