ग्राहकांना सर्व्हिस देण्यास कर्मचाऱ्यांची टाळाटाल
| कोलाड | वार्ताहर |
महाराष्ट्र विद्युत महामंडळाचा कारभार आहे तरी कसा तर कोलाड सबस्टेशनमधून कोलाड खांब देवकान्हे परिसरात विजेचा सावळागोंधळ असल्याने ग्राहकांना सर्व्हिस देण्यास संबंधित खाते तसेच कर्मचारीवर्गातून नियमितपणे टाळाटाळ करण्यात येत आहे. याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल आता ग्रामीण भागातील वीज ग्राहकांकडून व्यक्त केला जात आहे.
कोलाड खांब देवकान्हे परिसरात अनेक गावे ही ग्रामीण भागात वसलेली आहेत, त्यामुळे ऐन पावसाळ्यात नेहमीच विजेचा सावळागोंधळ असल्याने ग्राहकांना होत असलेला वीजपुरवठा खंडित झाल्याने त्यांना रात्री-अपरात्री अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून, यावर नियंत्रण कोणाचे, तर दुसरीकडे विद्युत महामंडळाच्या वतीने नेमण्यात आलेले खासगी कर्मचारी हेदेखील वेळीच ग्राहकांच्या तक्रारींचा निवारण करत नसल्याने तसेच त्यांना वेळीच सेवा देत नसल्याने अधिक मोठी समस्या ग्राहकांसमोर उभी राहात आहे. दरम्यान, संबंधित नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांना संपर्क साधला की त्याला उलटसुलट उत्तरे दिली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे गावागावातून महावितरणच्या गलथान आणि कामचुकारपणाबद्दल एकच संतापाची भावना व्यक्त केली जात आहे.
तरी संबंधित खात्याच्या सब डिव्हिजनच्या कनिष्ठ अभियंता अथवा वरिष्ठ अधिकारी वर्गाने याकडे लक्ष केंद्रित करून येथील नागरिकांना वेळोवेळी सेवा देण्यासाठी तसेच त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी अधिक लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून केली जात आहे.