कोळशाअभावी औष्णिक वीजप्रकल्पातील वीजनिर्मिती बंद

। मुंबई । वृत्तसंस्था ।
देशात कोळशाची कमतरता असल्यामुळे देशातील औष्णिक वीज प्रकल्पातील वीज निर्मिती बंद करण्यात आली आहे. याच पार्श्‍वभूमीवर कोयना प्रकल्पात अतिरिक्त म्हणजे दिवसाला सुमारे पाचशे ते पंधराशे मेगावॉट वीज निर्मिती करण्यात येत आहे. पुढील काही दिवस ही अतिरिक्त वीज निर्मिती सुरू राहणार असल्याची माहिती पोफळी येथील महाजनकोफच्या अधिकार्‍यांनी दिली. कोयना प्रकल्पाच्या चार टप्यांतून एक हजार 920 मेगावॉट वीज निर्मिती केली जाते. मागणीच्या काळात म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी कोयना प्रकल्पातून वीज निर्मिती केली जाते. मात्र, सध्या राज्यात विजेचा तुटवडा असल्यामुळे प्रकल्पाच्या चारही टप्यातून मागणीनुसार 24 तास वीजनिर्मिती सुरू आहे. वीज निर्मितीसाठी उपलब्ध असलेल्या पाण्याचे नियोजन करून प्रकल्पात अतिरिक्त वीजनिर्मिती करण्यात येत आहे. महाराष्ट्रात खासगी आणि सरकारी कंपन्यांमधून वीज निर्मिती झाल्यानंतर ती कळवा येथील ग्रीडमध्ये आणली जाते. तेथून ती पूर्ण राज्याला मागणीनुसार वीज पुरवली जाते. ऑक्टोबर हीटमुळे सध्या विजेची मागणी 21 हजार मेगावॅटहून अधिक नोंदली जात असतानाच राज्यातील औष्णिक वीज प्रकल्पांवर कोळसा टंचाईचे संकट ओढवले आहे. महानिर्मितीकडे केवळ दोन-तीन दिवस पुरेल एवढा तुटपुंजा कोळसा उपलब्ध आहे. त्यामुळे काही तांत्रिक कारणांमुळे एक-दोन दिवस कोळसा वाहतूक ठप्प झाल्यास संबंधित वीज प्रकल्पांमध्ये होणारी वीज निर्मिती ठप्प होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यातही लहरी पावसाळ्यामुळे कोळसा भिजल्यामुळे आवश्यक तेवढा काढता येत नाही. त्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून महानिर्मितीला कोळशाचा अपुरा पुरवठा आहे. राज्यात कोळशाच्या माध्यमातून वीज निर्मिती करणारे महानिर्मितीचे सात वीज प्रकल्प असून आठ खासगी प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांमधून दररोज सुमारे 12 हजार मेगावॅट वीज निर्मिती होत असून उर्वरित वीज इतर प्रकल्पांमधून होते. केंद्रीय वीज प्राधिकरणाच्या नियमानुसार कोळशावरील वीज प्रकल्पांमधून सुरळीतपणे वीज निर्मिती होण्यासाठी त्यांच्याकडे सुमारे 25-30 दिवस पुरेल एवढा कोळशाचा साठा असणे आवश्यक आहे. महानिर्मितीच्या सात वीज प्रकल्पांना दिवसाला सुमारे सवा लाख मेट्रिक टन कोळशाची अपेक्षा असते.

Exit mobile version