आमदारांची सत्ता, विकास बेपत्ता

निधीचा बोलबाला, कामांचा ठणठण गोपाळा; कागदावरच्या विकासाविरोधात जनतेच्या मनात खदखद

| रायगड | खास प्रतिनिधी |

विकासाच्या नावाने गमजा मारणार्‍या सत्ताधार्‍यांचे पितळ आता उघडे पडत आहे. हजारो कोटींच्या निधीचा बोलबाला करुन प्रत्यक्षात विकासाच्या नावाने ठणठण गोपाळ असे चित्र रायगड जिल्ह्यात विशेष करुन अलिबाग-मुरुड विधानसभा मतदारसंघात दिसून येते. स्थानिक आमदारांनी एमएमआरडीसह विविध योजनांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचा निधी आणल्याची ओरड केली. मात्र, प्रत्यक्षात गेल्या पाच वर्षात ठोसपणे विकासाचे कोणतेच काम मतदारसंघात झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे आमदारांनी कागदावर दाखवलेल्या विकासाबद्दल आता जनतेच्या मनात सवाल उपस्थित होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.


आमदरांसह त्यांच्या बगलबच्च्यांनी सत्तेचा उपभोग घेऊन आता पाच वर्षांचा काळ संपत आला आहे. पुढील दोन-तीन महिन्यांमध्ये आता विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे मतदारसंघात विकासाचा मुद्दा आता उघडपणे चर्चीला जात आहे. आमदारांच्या कामाचे मूल्यमापन करण्यास मतदारांनी सुरुवात केली आहे. गेल्या पाच वर्षांत हजारो कोटींचा निधी मतदारसंघात आणल्याची ओरड केली जात आहे. त्यामध्ये प्रामुख्याने रेवस-कंरजा पुलासाठी सुमारे तीन हजार 500 कोटी, अलिबाग तालुक्यातील सांबरकुंड धरणाच्या कामासाठी तब्बल दोन हजार कोटी, अलिबाग-रोहा रस्त्यासाठी सुमारे 200 कोटी आणल्याचे आमदारांसह त्यांच्या पदाधिकार्‍यांनी जाहीर कार्यक्रमांतून सांगितले आहे.

जे बोलतो तेच करतो, असे समाज माध्यमांच्या माध्यमातून शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी सातत्याने जनतेच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, कोटीच्या कोटी उड्डाणे करुनदेखील प्रत्यक्षात कामाची एक वीटदेखील लागली नसल्याचे दिसून येते. त्यामुळे नुसती जाहिरातबाजी करणार्‍यांनी आपली नैतिक जबाबदारी म्हणून ही कामे का पूर्ण झाली नाहीत, याची कारणे जनतेला, पर्यायाने मतदारांना सांगणे अनिवार्य नाही का? कोट्यवधींचे आकडे दाखवून मतदारांना अधिक काळ भुलवता येणार नाही. यासाठी जनतेचे प्रश्‍न तडीस नेणे गरजेचे असते.

हा निधी कमी पडला म्हणून आत्या नव्याने जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या सात मजली इमारतीसाठी 150 कोटी 60 लाख रुपयांचा निधी, तसेच रायगड जिल्हा परिषदेच्या शिवतीर्थ इमारतीसाठी 77 कोटी रुपये मंजूर केल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. त्यामुळे मतदारसंघात हजारो कोटी रुपयांचा निधी येत असेल, तर विकास हा दिसलाच पाहिजे ना. परंतु, मतदारसंघात विकास झाल्याचे स्पष्ट चित्र अद्याप तरी दिसत नाही. त्यामुळे मतदार राजाच्या मनात विकासाबाबत प्रश्‍न निर्माण होत आहेत. रायगडचे पालकमंत्री उदय सामंत हे नियोजन समितीच्या बैठकीसाठी अलिबाग येथे आले होते. त्यांना याप्रश्‍नी छेडले असता, तेदेखील समर्पक उत्तर देऊ शकले नाहीत. त्यामुळे आगामी काळात जनतेच्या मनातील विकासाबद्दलचा आक्रोश बाहेर पडण्यास सुरुवात झाल्यास नवल वाटायला नको.

Exit mobile version