कर्जत तालुक्यात वीजभट्टी उत्पादक संकटात

अवकाळी पावसाने मोठे नुकसान; रॉयल्टीमध्ये सवलत देण्याची मागणी
। नेरळ । वार्ताहर ।
अवकाळी पावसाने शेतकरी आणि वीटभट्टी उत्पादक यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात कडधान्य पिकविणारे शेतकरी आहेत. त्याचवळी कर्जत तालुक्यातील मातीपासून बनलेली वीटभट्टी बांधकाम व्यावसायिक हे विशेष पसंत करीत असतात. त्या वीटभट्टी उत्पादकांचे अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे.दरम्यान, या अवकाळी पावसामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीबद्दल शेतकरी आणि उद्योजक यांना भरपाई मिळण्याची शक्यता कमी आहे. तालुक्यातील सर्व भागात वीटभट्टी व्यवसाय स्थानिक तरुण शेतकरी करीत आहेत. अवकाळी पावसाने अनेक भागात मोठ्या प्रमाणात वीटभट्टी उत्पादक यांचे नुकसान केले आहे. वीटभट्ट्यांवर विटांचे उभे असलेले थर कोसळून गेले आहेत. त्या त्या ठिकाणी सर्वत्र बनवलेल्या विटांची माती झाली आहे. त्यामुळे गेल्या विटा बनविण्यासाठी घेतलेली मेहनत फुकट गेली आहे.

गेल्यावर्षी कोव्हिडच्या प्रादुर्भावामुळे, तर यंदा लहरी हवामानामुळे वीट उत्पादन करण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. डिसेंबर महिना उजाडला तरी अद्याप वीट उत्पादन करायचे की नाही? असा प्रश्‍न पडला आहे. त्यामुळे तालुक्यातील वीटभट्टी उत्पादकांनी एकत्र येत कर्जत तहसीलदारांना रॉयल्टीमध्ये सवलत व भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी, असे निवेदन दिले आहे. पावसाचे बदललेले ऋतुमान यामुळे आगामी कालावधीमध्येसुद्धा अवकाळी पावसाची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन वीट उत्पादकांनी कर्जतचे निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी भेट घेऊन रॉयल्टी भरण्याची मुदत वाढवावी आणि सवलत द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन वीटभट्टी उत्पादक यांच्याकडून शासनाला देण्यात आले. त्यावेळी रवींद्र देशमुख, पंढरीनाथ राणे, राजेश जाधव, अनंता धुळे, धोंडू राणे, उत्तम शेळके, रवींद्र भोईर, शैलेश पाटील, संतोष बोराडे, सरफराज मुल्ला, जयंता भोईर, नरेश भोईर, चंद्रकांत शेळके, रवींद्र शेळके, मन्सूर मालदार, अंकुश भोईर, चंद्रकांत हगावणे, हनिस हवालदार, रामदास शेळके, कुमार गंगावणे, अशोक पाटील, महेंद्र जाधव, नंदू लाड, जयेंद्र मुने, अतुल काळोखे, प्रभाकर पाटील, हनुमंत पाटील, प्रकाश बागडे, झाकीर कर्णेकर, राजेश कर्णूक, किशोर दळवी आदी वीट उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version