पॉवर स्टेशन इमारत बनली धोकादायक

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरान शहरातील पॉवर स्टेशनची इमारत 95 वर्षाची जुनी इमारत आहे. ही इमारत धोकादायक स्थितीत असून, देखील महावितरण कंपनीकडून त्या इमारतीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे.

माथेरान शहरातील पॉवर स्टेशन इमारतीच्या ठिकाणी मागील 20 वर्षांपूर्वी कर्मचारी निवासस्थान बांधण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. मात्र, त्या इमारतीचे काम पूर्ण झाले नाही आणि आजही अर्धवट स्थिती आहे. परंतु, आता त्या इमारतीचे काम अनेक वर्षे अर्धवट राहिल्याने कर्मचाऱ्यांचे निवासासाठी बांधण्यात आलेली इमारत धोकादायक स्थितीत आहे. इमारतीमध्ये महावितरणचे स्विचिंग स्टेशन आहे. ते पॉवर हाऊसदेखील धोकादायक स्थितीत असून, माथेरान पंचवटी भागात असलेले वीज केंद्र इमारत कोसळल्यास अनेक दिवस माथेरान अंधारात जाण्याची भीती आहे. त्या इमारतीमधून स्विचिंग स्टेशनचा कारभार सुरु असताना महावितरणन काळजी घेण्याची गरज ग्राहक व्यक्त करीत आहेत. त्याचवेळी भविष्यातील गरज लक्षात घेऊन महावितरण कंपनीने नवीन स्विचिंग स्टेशन आणि पॉवर स्टेशन बाबत पुढाकार घेण्याची मागणी केली जात आहे.

Exit mobile version