वीज पडल्याने विद्युत तारा तुटल्या; इन्सुलेटर फुटले; महावितरणचा तत्पर प्रतिसाद
। सुधागड-पाली । प्रतिनिधी ।
ऐन गणेशोत्सवात गुरुवारी (दि. 27) पहाटे चार ते दुपारी बारा वाजेपर्यंत सुधागड तालुक्याची वीज तब्बल आठ तास गुल होती. झाड व वीज पडल्याने विद्युत तारा तुटल्या आणि इन्सुलेटर फुटून वीज पुरवठा खंडित झाला होता.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वारा पाऊस यामुळे उंबरवाडी येथील जंगलात एका ठिकाणी झाड कोसळून विजेच्या तारा दोन ठिकाणी तुटल्या. तर दुसऱ्या ठिकाणी वीज पडून इन्सुलेटर फुटले व विजेच्या तारा तुटल्या. परिणामी संपूर्ण सुधागड तालुक्यातील वीजपुरवठा पहाटे चार वाजता खंडित झाला.
वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर वीज महावितरणचे कर्मचारी लागलीच दोष (फॉल्ट) शोधण्यासाठी निघाले. त्यावेळी लक्षात आले की उंबरवाडी येथे फॉल्ट आहे. हे क्षेत्र पूर्ण डोंगराळ व दाट वनांचे आहे. दोष झालेल्या ठिकाणी महावितरणचे कर्मचारी पोचल्यानंतर लगेच झाड तोडण्याची तसेच वीज तारा जोडण्याचे आणि इन्सुलेटर बसवण्याचे काम सुरू करण्यात आले. वीज महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम करून अखेर वीजपुरवठा पुन्हा सुरळीत केला, असे उपकार्यकारी अभियंता बालाजी चात्रे यांनी सांगितले.
मात्र, ऐन गणेशोत्सवात तब्बल आठ तास वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे सुधागड तालुक्यातील जनता मेटाकुटीला आली होती.
वीज कर्मचाऱ्यांचे अथक परिश्रम
पावसाळ्यात खांबावर वीज कोसळल्यामुळे तीव्र उच्च दाबामुळे विद्युत यंत्रणेतील सुरक्षा कवच असणाऱ्या या इन्सुलेटर्सना तडे जातात व ते फुटतात. म्हणून पावसाळ्यात वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढते. विद्युत वाहिनी कधी रस्त्याकडेने, कधी शेतातून, झाडी वनांतून तर कधी ओढ्यातून, डोंगरातून गेलेली असते. त्यामुळे नेमका बिघाड शोधण्याकरीता रात्री-अपरात्री वीज कर्मचाऱ्यांना गस्त घालावी लागते, कसून तपासणी करावी लागते.
इन्सुलेटर्स म्हणजे काय?
विद्युत वाहिनीवर वीजतारा आणि वीज खांब यात विद्युतरोधक म्हणून चिनी मातीपासून बनवलेल्या साधनांचा वापर केला जातो. 33 केव्ही/11 केव्ही या विद्युतवाहक उच्चदाब व विद्युत वितरण लघुदाब वाहिन्यात वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या विद्युत रोधकांना प्रकारानुसार इंग्रजी भाषेत ‘पिन इन्सुलेटर’, डिस्क इन्सुटेलर, ‘सॅकल इन्सुलेटर’ असे संबोधले जाते.
