जनतेने दाद कोणाकडे मागायची?
| महाड | जुनेद तांबोळी |
तब्बल 24 तास उलटून गेले तरी महाड तालुका अंधारात बुडाला आहे. महाड औद्योगिक वसाहत परिसरात विद्युतपुरवठा करणार्या केबल रस्त्याचे काम करणार्या ठेकेदारामुळे तुटल्या आहेत. त्यामुळे पूर्ण तालुक्यासहित महाड शहरात वीजपुरवठा 24 तासापासून खंडित झाला आहे. उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असताना मतांचा जोगवा मागणारे नेते मात्र गायब झाले असून, तालुक्यातील जनता त्रस्त झाली आहे. या जनतेने न्याय कोणाकडे मागायचा, असा सवाल शिरगाव ग्रामपंचायत विद्यमान सरपंच सोमनाथ दिगंबर ओझर्डे यांनी राजकीय पुढार्यांना व प्रशासनाला केला आहे.
महाड औद्योगिक वसाहतीमधील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम करणार्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे व व एमआयडीसीच्या अधिकार्यांच्या दुर्लक्षितपणामुळे 17 एप्रिलपासून संपूर्ण महाड तालुक्यात वीजपुरवठा खंडित झाला असून, त्यामुळे महाड शहरासहित तालुक्यातील सर्व गाववाड्यांमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, गावात सुरू असलेल्या लग्नसराई, यात्रा, जत्रा, तसेच पाणीपुरवठ्यावरही मोठा परिणाम झाला आहे.
यासंदर्भात शिरगावचे विद्यमान सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी विद्युत महामंडळाचे कार्यकारी अभियंता रामकृष्ण पाटील यांच्याशी थेट दूरध्वनीवरून संपर्क साधून याबाबत तालुक्यातील जनतेची नाराजी व्यक्त केली व तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. यावेळी चौकशीअंती असे सांगण्यात आले की, (महाड औद्योगिक वसाहतीमधील) एमआयडीसीकडून रस्ते व गटारासाठी जेसीबीने सुरू असलेल्या खोदकामामुळे महावितरणने टाकलेली 22 के व्ही. (भूमीगत विद्युत लाईन) अंडरग्राऊंड लाईन तुटली आहे.
महाड औद्योगिक वसाहतीमधील भूमीगत विद्युत वाहिनी तुटली, त्याला पूर्णपणे एमआयडीसीच्या अयोग्य व नियोजनशून्य कामामुळेच हे झाले आहे, यामुळे संपूर्ण महाड तालुका दोन दिवसांपासून अंधारात आहे.
दरम्यान, संपूर्ण महाड तालुक्याला योग्य वीजपुरवठा होण्यासाठी स्वतंत्र ईएचपी स्टेशन आवश्यक आहे. शिरगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ईएचपीसाठी लागणारी जागा शिरगावमध्ये उपलब्ध करून देण्याची तयारी सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी दर्शवली आहे.
महावितरणचे कार्यकारी अभियंता पाटील यांना हा प्रस्ताव वरिष्ठ अधिकार्यांकडे त्वरित पाठवण्याची विनंती करण्यात आली आहे. याबाबत शिरगावचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी शुक्रवारी रात्रीसुद्धा विद्युत महामंडळाच्या कार्यालयाला भेट देऊन अधिकार्यांशी चर्चा केली व काम चालू असलेल्या ठिकाणी स्वतः भेट देऊन पाहणी केली. यावेळी महाड महावितरणचे अधिकारी भोई भेटले असता त्यांनी खोदकामामुळे वायर डॅमेज झाल्याचे मान्य केले.
शहर व ग्रामीण भाग यामध्ये भेदभाव न करता सर्वांना समान वीजपुरवठा मिळावा, हीच जनतेची मागणी आहे. यासाठी शिरगाव ग्रामपंचायत आवश्यक असणारी जागा उपलब्ध करून देण्यास तयार असल्याचे सोमनाथ ओझर्डे यांनी सांगितले.
एकंदरीत चार महिन्यांपूर्वी मतांचा जोगवा मागणारे राजकीय पक्षाचे पुढारी मात्र महाड तालुका 24 तास अंधारात असतानादेखील याबाबत चकार शब्द न बोलता गेले कुठे, असा सवाल सोमनाथ ओझर्डे यांनी या राजकीय पक्षाच्या पुढार्यांना विचारला आहे.