जीव धोक्यात घालून वीजपुरवठा सुरळीत


महावितरणच्या कर्मचार्‍यांची कमाल
धरणात पोहत जाऊन जोडल्या तारा

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत तालुक्यातील पळसदरी परिसरातील वीज पुरवठा करणारी वीज वाहिनी तुटली होती. त्यामुळे तीन दिवस बंद असलेला वीजपुरवठा महावितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांनी तेथील रेल्वेच्या धरणात पोहत जाऊन विजेच्या तारा खेचून नेल्या आणि वीज वाहक तारा यांची जोडणी केली. दरम्यान, तब्ब्ल 27 तास हा प्रयत्न सुरु होता आणि महावितरणच्या वायरमन यांनी केलेल्या कामगिरीमुळे पूर्ण क्षमतेने भरलेल्या तलावात अनेक वेळा प्रयत्न करून विजेच्या तारा वाहून नेण्याचे काम केले आणि पळसदरी भागातील वीजपुरवठा सुरळीत केला.


कर्जत महावितरणच्या दहिवली सेक्शनमधील पळसदरी ग्रामपंचायत हद्दीतील वीजपुरवठा 12 जुलै रोजी खंडित झाला होता. त्यावेळी महावितरणच्या कर्मचार्‍यांनी शोध घेतला असता, वीजवाहक तारा तुटल्या होता आणि त्या तारा नवीन टाकण्यात आल्याशिवाय वीजपुरवठा सुरळीत होणार नव्हता. मात्र, पळसदरी गाव ते पळसदरी आदिवासी वाडी यादरम्यान ज्या ठिकाणी तारा तुटून गेल्या होत्या, त्या ठिकाणी दोन खांबांमधील अंतर तब्बल 500 मीटर एवढे होते. मात्र, ते अंतर हे रेल्वेच्या धरणातील असल्याने त्या वीजवाहक तारा कशा नवीन टाकायच्या, असा प्रश्‍न निर्माण झाला होता. पळसदरी धरण काठोकाठ भरलेले असल्याने धरणाच्या पाण्यातून पोहत जाऊन तारा ओढत न्याव्या लागणार होत्या आणि त्यामुळे ते दिव्य काम कसे पूर्ण करणार, असा महावितरणसमोर प्रश्‍न होता.


तब्बल 27 तास प्रयत्न
महावितरणचे सहाय्यक अभियंता गणेश देवके यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता वैभव डफल यांनी आपले सहकारी यांना सोबत घेतले आणि पाण्यातून तारा वाहून नेण्याचे नियोजन केले. धरणाच्या कडेला राहून मार्गदर्शन घेत दशरथ मेहतर, गणेश मेहतर आणि रामदास भगत या तीन कर्मचारंनी अनेक तास प्रयत्न करून वीज वाहक तारा कंडक्टर हे पाण्यातून पोहून जात ओढून नेण्याचे काम केले. दरम्यान, त्या कर्मचारी वर्गाच्या मेहनतीला 27 तासांनी यश आले आणि पळसदरी येथील धरणाच्या पाण्यातून वीज वाहक कंडक्टर टाकून वीजपुरवठा सुरळीत होऊ शकला. महावितरणच्या कर्मचार्‍यांनी तीन दिवस तालुक्यातील वेगवेगळ्या भागात वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

Exit mobile version