पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित

बोर्ली, मांडला, भोईघर ग्रामपंचायतीतर्फे निवेदन
। कोर्लई । वार्ताहर ।
कोणतीही पुर्वसुचना न देता महावितरणने ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीला मुरुड तालुक्यातील बोर्ली, मांडला व भोईघर ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने ग्रामस्थातून तीव्र नाराजी व्यक्त होत असून पथदिव्यांचा वीजपुरवठा तातडीने सुरु करण्यात यावा याबाबत मुरुडचे वीज अभियंता यांना ग्रामपंचायतीच्या वतीने निवेदन देण्यात येऊन मागणी करण्यात आली आहे.

तालुक्यातील बोर्ली, मांडला व भोईघर या ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने बोर्ली व भोईघर ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व सदस्य यांची नुकतीच एक बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत महावितरणाने ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीला कोणतीही पुर्वसुचना न देता पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तरी  पथदिव्यांअभावी ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीला दुर्गम ग्रामीण भागातील जनतेला होणारा त्रास लक्षात घेऊन शासन स्तरावर वीजबिल भरणे बाबत तरतूद करण्यात येऊन ग्रामपंचायतीला सहकार्य मिळावे असे ग्रामपंचायतीच्या वतीने महावितरणला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.सदर निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, ऊर्जामंत्री नितिन राऊत, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्ष, मुरुड तहसीलदार गमन गावित, पंचायत समितीचे सभापती, गटविकास अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. यावेळी बोर्ली सरपंच चेतन जावसेन, उपसरपंच मतीन सौदागर, सदस्य गणेश कट, भोईघर सरपंच काशिनाथ वाघमारे, मांडला सरपंच सुचीता पालवणकर, उपसरपंच राजेश पाटील, सदस्य उपस्थित होते.

Exit mobile version