वारंवार आग लावल्यामुळे परिसरात धुराचे ढग
| पोयनाड | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील सर्वांत गजबजलेल्या आणि सुप्रसिद्ध बाजारपेठांपैकी एक म्हणून पोयनाड गावाची ओळख आहे. अलिबाग तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यातून नागरिक मोठ्या संख्येने पोयनाड येथे मिरची-मसाला व अन्य गरजेच्या वस्तू होलसेल दरात खरेदी करण्यासाठी येतात. दर सोमवारी भरणारा पोयनाडचा आठवडी बाजार जिल्हाभर प्रसिद्ध आहे. मात्र, अशा नावाजलेल्या गावाची आज परिस्थिती घाणीचे साम्राज्य अशी झाली असून, पोयनाडच्या वेशीवर बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेल्या डंपिंग ग्राउंडमुळे नागरिकांचे जगणे अक्षरशः असह्य झाले आहे.
स्थानिकांच्या आरोपानुसार, येथे मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात असून, दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या अवैध डंपिंग ग्राउंडच्या शेजारीच झुंझारचे भव्य क्रीडांगण असून, जिल्हाभरातून खेळाडू क्रिकेट आणि कबड्डी स्पर्धांसाठी येथे येतात. परिसरात मोठ्या हौसिंग सोसायट्या, हॉस्पिटल तसेच हॉटेल-रिसॉर्टही आहेत. त्यामुळे या दुर्गंधीचा फटका स्थानिकांसह बाहेरून येणाऱ्या नागरिकांनाही बसत आहे.
कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे चिकनगुनिया, मलेरिया आणि डेंग्यूसारख्या साथींचा धोका निर्माण झाला आहे. त्यातच या डंपिंग ग्राउंडला वारंवार आग लावली जात असल्याने परिसरात सतत धुराचे ढग पसरतात. परिणामी खेळाडू, नागरिक आणि ये-जा करणाऱ्या लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
याहूनही धक्कादायक बाब म्हणजे स्थानिक ग्रामपंचायत आणि प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. कचरा व्यवस्थापनातील हलगर्जीपणा आणि बेकायदेशीर डंपिंगमुळे समस्या दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे. अनेक वेळा तोंडी तसेच लेखी तक्रारी देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या पोयनाडमधील नागरिक आणि खेळाडूंनी आता या अवैध डंपिंग ग्राउंडविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
आंदोलनाचा इशारा
प्रशासनाने तात्काळ कारवाई करून हे डंपिंग ग्राउंड हटवावे, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा स्पष्ट इशारा स्थानिकांनी दिला आहे. पोयनाडसारख्या प्रसिद्ध गावाची अशी दुर्दशा होत असताना प्रशासनाचे डोळे अजूनही उघडणार की नाही? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
