ग्रामपंचायत प्रशासनाचा नागरिकांच्या जीवाशी खेळ
| भाकरवड | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील पोयनाड हे सुमारे 160 गावांना जोडणारे प्रमुख बाजारपेठ केंद्र असून, दररोज शेकडो नव्हे तर हजारो नागरिकांची बाजारहाट करण्यासाठी येथे वर्दळ असते. मात्र, या महत्त्वाच्या ठिकाणी नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळणारे प्रकार पोयनाड ग्रामपंचायत व संबंधित प्रशासनाकडून उघडपणे सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
ग्रामपंचायतीच्या हद्दीत कचऱ्याचे ढीग बिनधास्तपणे टाकले जात असून, त्याची कोणतीही योग्य विल्हेवाट लावली जात नाही. विशेष म्हणजे, पोलीस ठाण्याच्या अगदी शेजारीच असलेल्या डम्पिंग ग्राऊंडमध्ये मृत कुत्रे, बकऱ्या फेकल्या जात असून, हा कचरा 24 तास जाळला जात आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात तीव्र दुर्गंधी, घातक धूर आणि अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे.
दरम्यान, हा कचरा डम्पिंग ग्राऊंडच्या अगदी लगतच पोयनाडमधील एकमेव मोठे खेळाचे मैदान आहे. येथे दररोज तरुण मुले सराव करतात तसेच मोठ्या स्तरावरील क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. मात्र, धुराने वेढलेल्या या मैदानात खेळणाऱ्या खेळाडूंच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, प्रशासन मात्र डोळेझाक करत आहे, असा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
डम्पिंग ग्राऊंडची प्रत्यक्ष पाहणी केली असता परिस्थिती अत्यंत घाणेरडी, धक्कादायक आणि अमानवी असल्याचे स्पष्ट दिसून येते. सतत जळणाऱ्या कचऱ्यामुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचे आजार, डोळ्यांची जळजळ, दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, याच परिसरात डॉ. शिंदे यांचे मोठे रुग्णालय असून, उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांनाही या प्रदूषणाचा मोठा त्रास होत आहे.
सध्या ग्रामपंचायतीत प्रशासक व ग्रामसेवक कार्यरत असतानाही या गंभीर प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. 160 गावांतील लोकांची वर्दळ असलेल्या बाजारपेठेच्या मध्यभागी आणि एकमेव खेळाच्या मैदानाच्या शेजारी असे बेजबाबदार कचरा व्यवस्थापन म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळण्यासारखेच आहे. तात्काळ कचरा हटवून योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी, डम्पिंग ग्राऊंड अन्यत्र हलवावे व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी संतप्त नागरिकांकडून केली जात आहे. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
प्रशासन बेजबाबदार
पोयनाड परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे ही ग्रामपंचायत व जिल्हा आरोग्य विभागाची जबाबदारी आहे. परंतु, प्रत्यक्षात मात्र पूर्ण ग्रामपंचायत निष्क्रिय ठरत असल्याचे चित्र आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाही जिल्हा व स्थानिक प्रशासनाला याबाबत काहीच सोयरसुतक नाही, असेच यावरुन दिसून येत आहे. त्यामुळे या बेजबाबदार प्रशासनाविरोधात नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
